महागाईचा आगडोंब! इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडले | पुढारी

महागाईचा आगडोंब! इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील सर्वसाधारण महागाई दर (डब्ल्यूपीआय) 12.94 टक्क्यांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. कमी बेस इफेक्टमुळे देखील महागाई निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात हा निर्देशांक उणे 3.37 टक्के इतका होता.

अधिक वाचा : इंधन दरात ४० दिवसांमध्‍ये २४ वेळा वाढ

सलग पाचव्या महिन्यात महागाई निर्देशांकात वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात हा निर्देशांक 10.49 टक्क्यांवर पोहोचला होता. मे मध्ये ज्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, त्यात क्रूड पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, नाफ्ता, फरनेस ऑईल आदींचा समावेश आहे. निर्मिती क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे उद्योग आणि व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा : सुशांत सिंहच्या टी-शर्ट्समधील संदेशांचा अर्थ काय?

मे महिन्यात इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 20.94 टक्क्यांच्या तुलनेत 37.61 टक्क्यांवर गेला आहे. निर्मिती क्षेत्राचा विचार केला तर एप्रिल महिन्यातील 9.01 टक्क्यांच्या तुलनेत हा निर्देशांक 10.83 टक्क्यांवर गेला आहे. खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक मात्र किरकोळ घट घेत 4.31 टक्क्यांवर आला आहे. खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक कमी होऊनही मे महिन्यात कांद्याचे दर 23.24 टक्क्यांनी कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात हेच दर 19.72 टक्क्यांनी कमी झाले होते. महागाई दर झपाट्याने वाढत असला तरी रिझर्व्ह बँकेने रेपो, रिव्हर्स रेपो दर कमी ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्क्यांखाली ठेवण्याचे उद्दिष्ट आरबीआयने ठेवले आहे.

Back to top button