सरकार स्थापनेपूर्वीच मंत्रीपदांबाबत चर्चांना ऊत; राज्याला ६ ते ८ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

सरकार स्थापनेपूर्वीच मंत्रीपदांबाबत चर्चांना ऊत; राज्याला ६ ते ८ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात तिसऱ्यांदा रालोआ आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच कुठल्या पक्षाला किती मंत्रीपदे आणि कुठली खाती मिळणार, याबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे. मोदी सरकारचा शपथविधी ९ जून रोजी होणार आहे. या शपथविधीपूर्वीच कुठल्या घटक पक्षाला किती आणि कुठली मंत्रीपदे द्यायची, याबाबत भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकांचा जोर आहे.

मोदी यांच्या सुचनेनुसार मंत्रीपदाच्या चर्चेसाठी भाजपकडून जे. पी. नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह या ज्येष्ठ नेत्यांची समिती बनवण्यात आली आहे. ही समिती घटक पक्षांच्या मंत्रीपदाबाबतच्या अपेक्षा जाणून घेणार आहे. घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चूघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय लोक दल आणि अन्य काही पक्षांनी मंत्रीपदाबाबत आपल्या अपेक्षा भाजपच्या समितीला कळविल्या आहेत.

महाराष्ट्राला मिळणार ६ ते ८ मंत्रीपदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून महायुतीला ६ ते ८ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ घातल्याने मंत्रीपदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला ४ ते ६ मंत्रीपदे येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कोणत्या पक्षाच्या काय अपेक्षा?

रालोआमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाला ४ मंत्रीपदांची अपेक्षा आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला ३ मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद तर एक राज्यमंत्रीपद अपेक्षित आहे. त्यानंतर अपना दल, राष्ट्रीय लोक दल, लोक जनशक्ती पक्ष आणि उर्वरित सर्व घटक पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news