Punjab C M : राजकीय ‘व्‍यवस्‍था’ बदलाचे स्‍वप्‍न पाहणारा कॉमेडीयन मुख्‍यमंत्रीपदी विराजमान | पुढारी

Punjab C M : राजकीय 'व्‍यवस्‍था' बदलाचे स्‍वप्‍न पाहणारा कॉमेडीयन मुख्‍यमंत्रीपदी विराजमान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

आम आदमी पार्टीला पंजाबमध्‍ये ऐतिहासिक यश मिळवून देणारे भगवंत मान यांनी आज मुख्‍यमंत्रीपदी शपथ घेतली. ( Punjab C M ) भगवंत मान हे सद्‍यस्‍थितीतील राजकीय व्‍यवस्‍थेवर प्रचंड नाराज असत. राजकीय व्‍यवस्‍थेत बदल करावाच लागेल, अशी भूमिका ते नेहमी आग्रहाने मांडत. आपल्‍या कॉमेडी शोमधूनही ते राजकारणातील विसंगतीवर नेमके बोट ठेवायचे, असे त्‍यांचे जन्‍मगाव सतोजमधील ग्रामस्‍थ सांगतात. आज राजकारणाची व्‍यवस्‍था बदलासाठी लागणारी ‘सत्ता’ भगवंत मान यांच्‍या हाती आली आहे. आता ते आपलं स्‍वप्‍न वास्‍तवात उतरणार का, हे आगामी काही वर्षांमध्‍येच स्‍पष्‍ट हाेणार आहे.

शपथविधीनंतर मुख्‍यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया म्‍हणाले, “आमदार झालो म्‍हणून…”

भगवंत मान यांचा जन्‍म १७ ऑक्‍टोबर १९७३ राेजी पंजाबमधील संगरुर जिल्‍ह्यातील सतोज गावामध्‍ये झाला. अवघे ९०० उंबर्‍याचे हे गाव आज मान यांच्‍यामुळे संपूर्ण पंजाबमधील चर्चेचा विषय ठरले आहे. घरामध्‍ये त्‍यांना जुगनू नावाने हाक मारली जाते. “हा मुलगा अंधारातही एक आशेचा किरण आहे. म्‍हणूनच आम्‍ही त्‍याला जुगून नावाने हाक मारतो”, असे त्‍यांची आई अभिमानाने सांगते.

भगवंत मान यांनी संगरुरमधील ‘एसयुएस’ कॉलेजमध्‍ये बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं. कॉलेजमध्‍येच त्‍यांच्‍यातील कलागुणांना वाव मिळाला. त्‍यांनी हास्‍य स्‍पर्धांसह कविता स्‍पर्धाही गाजवल्‍या. कॉलेज अर्धवट सोडलं. यानंतर ते पूर्णवेळ कॉमेडियन झाले. १९९४ ते २०१५पर्यंत त्‍यांनी पंजाबी आणि हिंदी चित्रपटांसह जाहिरात क्षेत्रातही काम केले. त्‍यांचा विवाह इंद्रप्रीत कौर यांच्‍याशी झाला. त्‍यांना एक मुलगा, मुलगी  आहे. मात्र २०१५मध्‍ये त्‍यांचा घटस्‍फोट झाला. सध्‍या त्‍यांच्‍या पत्‍नी मुलांसह अमेरिकेत वास्‍तव्‍यास आहे.

Punjab C M : ‘… तर चिखलामध्‍ये उतरावेच लागेल’

“मी एक कॉमेडियन म्‍हणून लोकांना हसवतो. त्‍यावेळी मी राजकीय आणि सामाजिक भूमिकाच मांडतो असतो. तुम्‍हाला जर चिखल साफ करायचा असेल तर त्‍यामध्‍ये उतरावेच लागेल. त्‍यामुळे मी राजकारणात आलो आहे”, अशा शब्‍दात त्‍यांनी राजकारणात येण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला हाेता.  त्‍यांच्‍या आपल्‍या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनप्रीत सिह बादल यांच्‍या पंजाब पीपल्‍स पार्टीमधून केली. २०१२ मध्‍ये त्‍यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्‍याचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर मनप्रीत सिंह बादल यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. तर भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

२०१४ मध्‍ये गाठली थेट लोकसभा

भगवतं मान यांनी २०१४ मध्‍ये संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तब्‍बल २ लाख मतांनी ही निवडणूक जिंकलीही. यानंतर पंजाबमध्‍ये ‘आप’ म्‍हणजे भगवतं मान असे समीकरणच बनलं. ते पक्षाचे स्‍टार प्रचारकही झाले. खासदार झाल्‍यानंतर त्‍यांनी गावातील सरकारी शाळेच्‍या इमारतीची डागडूज केली होती. यासाठी त्‍यांनी खासदार फंडमधून निधी उपलब्‍ध केला. आज या गावातील शाळा ही स्‍मार्ट सकूल म्‍हणून ओळखली जाते. तसेच ज्‍या वर्गात भगवंत मान यांनी शिक्षण घेतले तो वर्गही विेशेष वर्ग म्‍हणून ओळखले जातो. २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍यांनी ‘आप’च्‍या तिकिटावर जलालाबादमधून सुखबीर बादल यांच्‍याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्‍यांचा पराभव झाला. २०१९च्‍या लोकसभा निवडणुकीत ते पुन्‍हा एकदा एक लाखांहून अधिक मतांनी विजय झाले. आता मान हे पंजाबचे मुख्‍यमंत्री झाले असून  त्‍यांच्‍या मित्रपरिवारासह ग्रामस्‍थांना त्‍यांच्‍याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Punjab C M : जनतेशी दिलखुलास संवाद साधणारा नेता

पंजाबमधील माणूस म्‍हटलं की, सारं काही दिलखुलास. जोरजोरात बोलणे, पहडी हसणं आणि प्रश्‍न कोणताही असो दिलखुलासपणे आपलं मत मांडणे. राजकारणात भगवंत मान अल्‍पावधीत यशस्‍वी झाले त्‍यामागील महत्‍वाचे कारण म्‍हणजे त्‍यांची लोकांबरोबर संवाद साधण्‍याची हातोटी. हा नेता प्रचंड ऊर्जावान आहे. तो लोकांशी दिलखुलासपणे संवाद साधतो, अशी त्‍यांची ओळख बनली. त्‍यांना लिखाणाची आवड आहे. ते कवीदेखील आहे. स्‍पोर्टसमध्‍ये त्‍यांना विशेष रुची आहे.

…आणि दारु सोडण्‍याची घेतली शपथ

मागील काही वर्ष भगवंत मान यांना असणार्‍या दारुच्‍या व्‍यसनाची चर्चा होत होती. संसदेमध्‍ये ते दारुच्‍या नशेत असताना आले होते, असा आरोप भाजपच्‍या खासदारांनी केला होता. २०१६ मध्‍ये गायक मनमित अलिशे याची हत्‍या झाली. त्‍याच्‍या अंत्‍यसंस्‍कारावेळीही मान यांनी मद्‍यसेवन केले होते, असा आरोप झाला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्‍ये दारुच्‍या नशेत असलेले त्‍यांचे अनेक व्‍हिडीओ साेशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. १ जानेवारी २०१९ मध्‍ये भगवंत मान यांनी बरनाला येथे एक जाहीर सभेत, “यापुढे दारुच्‍या थेंबालाही स्‍पर्श करणार नाही”, अशी शपथ घेतली होती.

कॉमेडी शोचा रंगमंच ते मुख्‍यमंत्रीपदाचा मुकूट

भगवंत मान हे कॉमेडी शोमध्‍ये राजकीय नेत्‍यांची नक्‍कल करत असत. यातून राजकीय व सामजिक मुद्‍यांवरही ते भाष्‍य करत. एकेकाळी राजकीय नेत्‍यांची नक्‍कल करणारा हा कलाकार आता पंजाबच्‍या मुख्‍यमंत्रीपदी विराजमान झाला आहे.
त्‍यांच्‍या आयुष्‍यातील एक वर्तुळ आज पूर्ण झालंय. निश्‍चितच राजकारण हे कॉमेडी शो इतकं सोपे नाही. आज भगवंत मान यांच्‍यासमाेर प्रश्‍नांचा डोंगर आहे. ते हा डोंगर कसा सर करणार, याकडे विरोधी पक्षांसह पंजाबमधील सर्वसामान्‍य जनतेचेही लक्ष असणार आहे. कारण राजकारणात कॉमेडी करता येणे;पण त्‍यावर प्रत्‍येकवेळी ‘पिकला हशा’ असेच होत नाही. निश्‍चितच याचे भान भगवंत मान यांना असणार आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button