Eng vs Ind : इंग्लंडचा टीम इंडियावर ४ गडी राखून विजय | पुढारी

Eng vs Ind : इंग्लंडचा टीम इंडियावर ४ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ (icc women’s one day world cup)च्या १५ व्या सामन्यात, इंग्लंडने भारतीय संघाचा ४ गडी राखून पराभव केला (Eng vs Ind). प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ३६.२ धावा गमावून केवळ १३४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने ३१.२ षटकांत ६ बाद १३६ धावा केल्या आणि विजयाची नोंद केली. २३ धावांत ४ विकेट पटकावून भारताच्या डावाला खिंडार पडणा-या चार्ली डीनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. २८ धावांपर्यंत भारताने ३ विकेट गमावल्या होत्या. यास्तिका भाटिया (८), कर्णधार मिताली राज (१) या दोघींना अन्या श्रबसोलेने माघारी धाडले. तर दीप्ती शर्मा खाते न उघडता धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. मागील सामन्यात शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर १४ धावा करून बाद झाली. स्मृती मंधानाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि ३५ धावा करून बाद झाली. तळातील फलंदाज ऋचा घोष (३३) आणि झुलन गोस्वामी (२०) यांनी एकाकी झुंज देत भारताची धावसंख्या शतकाच्या पुढे नेली. या दोघी बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ १३४ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून चार्ली डीनने ४ बळी घेतले. (Eng vs Ind)

१३५ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. टॅमी ब्युमाँट आणि डॅनियल व्याट ही सलमीची जोडी काही खास प्रदर्शन करू शकले नाही. दोघी प्रत्येकी १-१ धाव करून बाद झाल्या. यानंतर कर्णधार हीदर नाइट आणि नताली सीवर यांनी डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. सीवर ४५ धावा करून बाद झाली. यानंतर नाइटनेही इतर फलंदाजांसोबत छोट्या भागीदारी केल्या आपले अर्धशतक (नाबाद ५३) पूर्ण केले. अशाप्रकारे इंग्लंडने ३१.२ षटकात ६ विकेट गमावत १३६ धावा करत विजय मिळवला. भारताकडून मेघना सिंगने ३ बळी घेतले. (Eng vs Ind)

इंग्लंडचा पहिलाच विजय… (Eng vs Ind)

या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी टीम इंडियाचा न्यूझीलंडने पराभव केला होता. भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत चार गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर या स्पर्धेतील इंग्लंड संघाचा हा पहिलाच विजय आहे. त्यामुळे त्यांचा संघ दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

Back to top button