२० लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण | पुढारी

२० लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनाचे २० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याने आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. दीपक उर्फ मुंशी रामसू इष्टाम( वय ३४)आणि शामबत्ती नेवरु आलाम (वय २५) अशी दोघांची नावे आहेत.

दीपक इष्टाम हा एटापल्ली तालुक्यातील गडेरी, तर शामबत्ती आलाम ही छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील हिदवाडा येथील रहिवासी आहे. दोघेही पती-पत्नी आहेत. दीपक हा नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक २१ चा विभागीय समिती सदस्य (डीव्हीसी), तर शामबत्ती ही याच प्लाटूनमध्ये सदस्य होती. दीपकवर खुनाचे ३, चकमकीचे ८ आणि जाळपोळीचे २ असे १३, तर शामबत्तीवर खुनाचे २ गुन्हे दाखल आहेत. दीपकवर शासनाने १६ लाख, तर शामबत्तीवर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

दीपक इष्टाम हा जुलै २००१ मध्ये कसनसूर दलमचा सदस्य म्हणून भरती झाला. त्यानंतर नोव्हेंबर २००२ पर्यंत तो चामोर्शी दलमचा सदस्य होता. त्यानंतर तो नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य देवजी याचा अंगरक्षक झाला. पुढे कंपनी क्रमांक १ मध्ये सेक्शन उपकमांडर आणि नंतर प्लाटून कमांडर झाला. २०१५ पासून तो प्लाटून क्रमांक २१ चा डीव्हीसी होता. नक्षल चळवळीत असताना त्याने पोलिसांचा घातपात करण्यासाठी ६ अॅम्बूश लावले होते. छत्तीसगडमधील कुदूरघाटी येथील अॅम्बूशमध्ये ४, झाराघाटी येथील अॅम्बूशमध्ये २ तर कोंगेरा येथील अॅम्बूशमध्ये २५ असे एकूण ३१ जवान ठार झाले होते. दीपकची पत्नी शामबत्ती ही २०१५ मध्ये जनमिलिशियामध्ये व त्यानंतर प्लाटून क्रमांक २१ मध्ये कार्यरत होती.

आज दोघांनीही पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्यामुळे दीपकला ६ लाख रुपये, तर शामबत्तीला अडीच लाख रुपये आणि पती व पत्नीने एकत्रितरित्या आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त दीड लाख रुपये असे एकूण १० लाख रुपयांची मदत शासनाकडून केली जाईल. शिवाय अन्य योजनांचाही लाभ देण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. २०१९ ते २०२२ पर्यंत ४५ नक्षल्यांनी, तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६४९ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button