कोरोना योद्ध्यांवरच ‘वार’; 81 जणांचे प्रस्ताव अडकले लाल फितीत

कोरोना योद्ध्यांवरच ‘वार’; 81 जणांचे प्रस्ताव अडकले लाल फितीत
Published on
Updated on

पुणे : टीम पुढारी

कोरोना आला… अन् अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली. कोरोनाला रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पुढे आलेले अधिकारी व कर्मचार्‍यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. विविध पातळ्यांवर कोरोनाशी दोन हात केले. गरज होती, तेव्हा यांनी दिवसरात्र जबाबदारी पार पाडली. जबाबदारी पार पाडताना कोरोनाने गाठले आणि त्यात काहींचा मृत्यू झाला. कोरोनामुळे संसाराचा आधारवड हरपलेल्या पुणे शहरासह जिल्ह्यातील 81 शासकीय कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना अद्याप पन्नास लाख रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

कोरोना विषाणू हा सर्वांसाठी नवीन होता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. परंतु जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलिस, महसूल आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचारासाठी मेहनत घेत होते. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांसाठी शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे महापालिकेतील 95, जिल्हा परिषदेतील 35, पोलिस 20 आणि महसूल विभागातील 6 जणांचा कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. यामधील 61 जणांच्या कुटुंबीयांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. 86 जणांना अनुदान मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा परिषदेत एकाच कुटुंबीयाला मिळाली मदत

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 35 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील केवळ एका कर्मचार्‍याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळाले आहे. उर्वरित 34 कर्मचार्‍यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. 35 पैकी 13 कर्मचारी ग्रामपंचायतींचे आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान मिळेल किंवा नाही याची शाश्वती नसली तरी हे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.

वीस पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

आरोग्य सेवेनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका पोलिस दलाला बसला. या कालावधीत पोलिस आपल्या व कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावर नागरिकांसाठी उभे होते. कोरोनामुळे पुणे पोलिस दलातील 20 अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. 7 जणांना सानुग्रह अनुदान मिळाले आहे, मात्र 13 पोलिस कुटुंबीय अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

असा आहे शासन निर्णय

कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणार्‍या शासकीय, खासगी, कंत्राटी, मानसेवी अशा सर्व कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विमासंरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

मृत्यू 95 जणांचा, 32 कुटुंबीय प्रतीक्षेत

राज्यात मुंबईपाठोपाठ सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध आघाड्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम केले. रुग्णांचे सर्वेेक्षण, शोध, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहे. महापालिकेतील कर्तव्यवार असलेल्या 95 जणांचा मृत्यू झाला असून, 63 जणांना सानुग्रह अनुदान मिळाले. दरम्यान या 95 पैकी दोन वर्ग एक अधिकारी, तर एक वर्ग दोनचे अधिकारी होते. तसेच 17 वर्ग तीन आणि उरलेले 75 हे वर्ग चारचे कर्मचारी होते, अशी माहिती नागरी विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली. याचाच अर्थ पुणे महापालिकेतील तब्बल 32 कोरोनायोद्ध्यांच्या कुटुंबीयांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे.

महसूलमधील चौघांच्या कुटुंबीयांना अनुदान

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये प्रशासकीय धुरा सांभळणार्‍या महसूल विभागातील 6 अधिकारी व कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी चार जणांच्या कुटुंबीयांना शासकीय पन्नास लाखांचे सानुग्रह अनुदान मिळाले असून, दोघांचे कुटुंबीय अजून प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच कर्मचारी महासंघाने मिळवून दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 52 अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 46 कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 75 लाख देण्यात आले, तर चार जणांसाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.
कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांचा लाभ मिळेल, तसेच कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अनुकंपावरील प्रतीक्षा यादीत ही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या एका कर्मचार्‍याच्या कुटुंबाला अर्थसाह्य मिळाले आहे, तर उर्वरित प्रस्ताव प्रलंबित आहेत.

– कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जि.प.

(वार्तांकन : नरेंद्र साठे, ज्ञानेश्वर भोंडे, अशोक मोराळे, समीर सय्यद, मिलिंद कांबळे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news