कॅन्सरमुळे दरवर्षी १५ लाख मृत्यू, प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राज्यसभेत मागणी | पुढारी

कॅन्सरमुळे दरवर्षी १५ लाख मृत्यू, प्रतिबंधात्मक उपाय करण्याची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेमध्ये विविध पक्षाच्या सदस्यांनी देशातील कॅन्सर या घातक आजाराचा वाढता प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली. याबाबत योग्य ते उपाय करण्याची मागणी राज्यसभेत केली. शुन्य प्रहरावेळी समाजवादी पक्षाचे रमण सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, देशात कॅन्सर हा आजार वेगाने पसरत आहे. दररोज जवळपास 1500 च्या आसपास लोकांचा मृत्यू यामुळे होत आहे.

ते पुढे म्हणाले की, “कॅन्सरमुळे दरवर्षी 12 ते 15 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. जर यावर काही ठोस उपाय केले नाही तर भविष्यात हा आजार रौद्र रूप धारण करेल.” त्यांनी गावोगावी शिबिरे सुरु करण्याची मागणी सरकारकडे केली. ज्यामुळे लोकांची तपासणी केली जाईल आणि यातून कॅन्सरची लक्षणे असणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यास सोपे होईल. “सरकारने या संबंधित विषयी तात्काळ पाऊल उचलावे” अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

यावर भाजपचे महेश  पोद्दार यांनी त्यांचे समर्थन करत म्हटले की, “प्रक्रिया केलेल्या मांसामुळे देखील कर्करोग होण्याचा धोका तितकाच असतो जो धूम्रपानामुळे होतो.” जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातही याची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. “अशी एक भीतीदेखील आहे की 2025 पर्यंत, एकट्या भारतात कर्करोगाच्या रुग्णांची वार्षिक संख्या १६ लाखांपर्यंत पोहोचू शकते,” असं मत यावेळी त्यांनी मांडले.

अमेरिकेतील लोकांच्या जीवनावर प्रक्रिया केलेल्या मांसाच्या परिणामाचा संदर्भ देत पोद्दार यांनी अशी मागणी केली की ज्याप्रमाणे सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कर्करोगाचे इशारे दिले जातात त्याचप्रमाणे प्रक्रिया केलेल्या मांसावरही कर्करोगाचा इशारा देण्यात यावा.

रोगांशी संबंधित चुकीची माहिती पसरवली जातेय – राष्ट्रवादी काँग्रेस

दरम्यान, सोशल मीडियावर विविध आजारांशी संबंधित चुकीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंदना चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने यावर आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची त्यांनी विनंती केली. त्या म्हणाल्या की, माहितीच्या अभावामुळे बरेच लोक अनेक रोगांना बळी पडतात. त्या म्हणाल्या की, कोविड-19 विरोधी लसींबाबत विविध सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहितीही दिसली आणि त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत संभ्रम निर्माण झाला. अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती पसरवणे थांबवावे आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button