WPI inflation rate : सलग दुसर्‍या महिन्यात महागाई दरात घट | पुढारी

WPI inflation rate : सलग दुसर्‍या महिन्यात महागाई दरात घट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : खाद्यान्नाचे दर चढे असले तरी अन्य श्रेणीतील वस्तुंचे दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या महिन्यात सर्वसामान्य महागाई निर्देशांकात (डब्ल्यूपीआय) (WPI inflation rate) घट नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलग दहाव्या महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर राहिलेला आहे. एप्रिल 2021 मध्ये हा निर्देशांक दहा टक्क्यांच्या वर गेला होता. डिसेंबर 2021 मध्ये हा निर्देशांक 13.56 टक्क्यांवर गेला होता. त्या तुलनेत जानेवारीत निर्देशांक 12.96 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

जानेवारी 2021 मध्ये डब्ल्यूपीआय निर्देशांक (WPI inflation rate) 2.51 टक्क्यांवर होता. गतवर्षीच्या तुलनेत महागाईत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारीमध्ये खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक 9.56 टक्क्यांवरुन 10.33 टक्क्यांवर गेला आहे. वार्षिक तत्वावर भाजीपाल्याचे दर 38.45 टक्क्याने वाढले आहेत. याशिवाय डाळी आणि भाताच्या दरात वाढ झाली आहे. अंडी, मटण, मासे यांचे दर 9.85 टक्क्यांने वाढले आहेत. त्या तुलनेत कांदा आणि बटाट्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. जानेवारीत मिनरल ऑईल, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, बेसिक मेटल्स, रसायन व रासायनिक पदार्थ यांच्या दरात वाढ झाल्याच्या व्यापार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

निर्मिती क्षेत्रातील वस्तुंचा विचार केला तर या श्रेणीचा निर्देशांक 9.42 टक्के इतका नोंदवला गेला. डिसेंबरमध्ये हा निर्देशांक 10.62 टक्क्यांवर होता. इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक जानेवारीत 32.27 टक्के इतका नोंदवला गेला. महागाई दर चढ्या स्तरावर असला तरी रिझर्व्ह बँकेने अलिकडेच पतधोरण जाहीर करताना रेपो दर चार टक्क्यांवर जैसे थे ठेवले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मुलं रोमॅन्टिक की मुली? काय म्हणतातयत मुंबईकर

Back to top button