whatsapp status : व्हॉट्स ॲप स्टेटसवरुन वाद, मारहाणीत महिलेचा मृत्यू | पुढारी

whatsapp status : व्हॉट्स ॲप स्टेटसवरुन वाद, मारहाणीत महिलेचा मृत्यू

पालघर : पुढारी वृत्तसेवा
व्‍हॉट्‍स ॲप स्‍टेटस ( whatsapp status ) हा आपल्‍या जगण्‍यातला भाग होत आहे; पण हाच ‘स्‍टेटस’ वादाचा कारण ठरला. एका कुटुंबाने  मुलीसह आईला मारहाण केली. यामध्‍ये आईला जीव गमवावा लागला. हा धक्‍कादायक प्रकार बोईसर ( जि.पालघर) शिवाजीनगर येथे घडला. लीलावती देवी प्रसाद (वय ४८ ) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलांच्या व्हाॅट्स अप स्टेटसवरून झालेल्या भांडणांमध्ये एका आईला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरातील हळहळ व्यक्त हाेत आहे.

whatsapp status : स्टेटसवरुन आईसह मुलीला बेदम मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लीलावती देवी प्रसाद यांच्‍या मुलीने काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲप स्टेटसवर एक मेसेज ठेवला होता. यावरुन कॉलेजमध्ये तिचे भांडण झाले. या भांडणाचे पडसाद तिच्या राहत्या घरी थेट शिवाजीनगर येथे नवीन वस्तीमध्ये उमटले. १० फेब्रुवारी रोजी प्रसाद यांच्या कुटुंबातील मुली व त्यांची पत्नी लीलावती देवी यांना काहीजणांनी मारहाण केली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आरोपींना सोडून दिले, असा आरोप लीलावती यांच्‍या मुलीने केला आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या लीलावती यांना तारापूर एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे उपचार सुरु असताना त्‍यांचा मृत्यू झाला. बोईसर पोलीस आरोपींना अटक करत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही, अशी भूमिका लीलादेवी प्रसाद यांचे पती व मुलींनी घेतली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आल्याचे बोईसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले. यानंतर  नातेवाईकांनी लीलावती देवी यांचा मृतदेह स्वीकारला.

हेही वाचलं का?

Back to top button