‘जयप्रभा’ची सर्व मिळकत शासनाने ताब्यात घ्यावी | पुढारी

‘जयप्रभा’ची सर्व मिळकत शासनाने ताब्यात घ्यावी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओची सर्व मिळकत शर्थभंग झाल्याने त्वरित सरकार हक्‍कात घ्यावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना ई-मेलद्वारे पाठविले आहे.

जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवार पेठेतील सि.स. नंबर 2814 ही सरकार हक्‍कातील जमीन तत्कालीन संस्थानने लीलाबाई पेंढारकर व इतरांना नाटक, कला, सिनेमा इत्यादीच्या वापरासाठी अटी, शर्थीने दिली. या अटी, शर्ती आजही कायम आहेत. सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र सुमारे तेरा एकर आहे.

ही मिळकत पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना विक्री केली तेव्हाच शर्थभंग झाला आहे. नंतर लता मंगेशकर यांच्या वतीने विकेश ओसवाल यांनी युएलसीखाली अतिरिक्‍त जमिनीवर सर्वसामान्यांसाठी घरे बनवण्याची स्कीम मंजूर करून घेतली. प्रत्यक्षात धनदांडग्यांना घरे दिली. याबाबतची तक्रार युएलसी प्राधिकरणाकडे दिली आहे.

या मिळकतीतील अतिरिक्‍त व नियमबाह्य बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र इत्यादीबाबत तत्कालीन आयुक्‍तांकडे तक्रार दिली. त्यानुसार चौकशीअंती महापालिकेतर्फे प्रिया सुरेश पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या एफआरआयमधील खाडाखोडीबाबत पोलिस अधीक्षकांना दिलेला ई-मेल आजही प्रलंबित आहे.

ही मिळकत व यातील बांधकाम आणि बाजूचा परिसर ही सर्व मिळकत हेरिटेज यादीत नोंद असल्याचे प्रतिज्ञापत्र आयुक्‍तांच्या वतीने हायकोर्टात दाखल आहे. त्यामुळे हेरिटेज यादीत नोंद असणार्‍या मिळकतीचे खरेदीपत्र नोंद करण्याची सहा. निबंधक यांची कृती बेकायदेशीर आहे.

गेली सुमारे 10 वर्षे सदर शर्थभंग आणि बेकायदेशीर खरेदी विक्री, बांधकाम सुरू असतानाही संबंधीत अधिकार्‍यांनी कायद्याचे पालन केले नाही. उलट संगनमताने या जमिनीच्या विल्हेवाटीसाठी मदत केली असे दिसून त्यामुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, पोलिस अधीक्षक या तिन्ही कार्यालयांनी आपापल्या कायद्यातील तरतुदी राबवून कायदा पूर्ण क्षमतेने राबवावा.

Back to top button