नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाने मणिपूर विधानसभा निवडणुकीत ( Manipur polls ) सर्व ६० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग हेईनगॅंग मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
पाच राज्यांच्या मतदान प्रक्रियेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातले मतदान होणार आहे. राज्यातले दुसऱ्या टप्प्यातले मतदान 14 तारखेला होईल. याच दिवशी उत्तराखंड आणि गोवा राज्याचे मतदान पार पडेल. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात 20 तारखेला मतदान होणार असून याच दिवशी पंजाबचे मतदान एकाच टप्प्यात होईल. मणिपूरचा विचार केला तर या राज्यात 27 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातले तर 3 मार्चला दुसऱ्या टप्प्यातले मतदान होणार आहे. मणिपूरमधील साठही जागांसाठी भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत. राज्यात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास भुपेंद्र यादव यांनी व्यक्त केला.
भाजपसाठी दीर्घकाळापासून काम करीत असलेल्यांना तसेच क्रीडा, प्रशासकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना तिकीट देण्यात आले असल्याचे यादव यांनी नमूद केले. मणिपूरमध्ये एकीकडे भाजप सर्व जागा लढवीत आहे तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पाच पक्षांसोबत आघाडी केली आहे. या आघाडीत भाकप, माकप, आरएसपी, संयुक्त जनता दल आणि फॉरवर्ड ब्लॉक यांचा समावेश आहे.
हेही वाचलं का?