शहापूर : राजेश जागरे : महाराष्ट्रातील शहापूर तालुक्यातील कसारा शहराजवळील पश्चिम घाटातील एक घाट म्हणजे कसारा घाट, यालाच थळ घाटही म्हणतात. मुंबई-नाशिक महामार्गावरील या घाटातून जाणारा रेल्वेमार्ग हा भारतात सर्वात उंच आहे. सर्वाधिक रहदारीचा घाट म्हणून कसारा घाटाची ओळख आहे. नजर हटी की दुर्घटना घटी, अशी या घाटावरील स्थिती असल्याने तो मृत्यूचा सापळा बनला आहे.
कसारा घाटात गेल्या 5 महिन्यांत 24 लहान-मोठे अपघात होऊन त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी झाले आहेत, यावरून घाटाची भयावस्था लक्षात येते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामागार्गावर शहापूर ते इगतपुरीपर्यंतचा हा घाट दोन वर्षांपूर्वी दरड कोसळली तेव्हापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. जे काही काम झाले, तेही तकलादू. यातूनच इन्फ्रा कंपनीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने तब्बल 4 कोटी 73 लाख 47 हजार 770 रुपयांचा दंड सुनावला होता.
इगतपुरी व शहापूर तालुक्यात दरवर्षी मोठा पाऊस होतो. संततधार पावसाने घाटात दरड कोसळणे व रस्ता वाहून जाणे नित्याचे आहे. दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणांवर रोल प्रेसिंगच्या जाळ्या बसवण्याच्या सूचना रोड रिसर्च सेंटरने करूनही कंपनी त्याकडे दुुर्लक्षच करते. दरड कोसळली म्हणजे वाहतूक ठप्प होते. 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावर मुंबई-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण झाले. तेव्हा नव्या कसारा घाटात वन विभागाच्या जागेत जमा केलेला मातीमिश्रित कचरा आणून जुन्या घाटातील भराव केल्याचा आरोप मागे झाला होता. कडेची भिंत केली तीही तकलादूच!
अरुंद रस्त्यामुळे मोखाडा-खोडाळाकडे जाण्यासाठी जुना घाट चढून पुन्हा नवीन घाटाला वळसा घालून जवळपास 10 ते 12 किलोमीटर (अर्धा किलो मीटरसाठी) फेर्याने जावे लागत आहे. मारावा लागत आहे. पावसाचे पाणी येथेच साचून मुरते म्हणून रस्ता खचतो. पाण्याच्या निचर्याचे नियोजन झाल्यास ही समस्या दूर होईल; मात्र कुणी लक्ष देत नाही.
गेल्या पावसात कसारा घाटातील फॉग सिटीजवळ (दाट धुक्याची एक जागा) चालकाला रस्त्यात सफेद पट्टा नसल्याने परिस्थितीचा अंदाज आला नाही व नियंत्रण सुटून ट्रक उलटला. वाहतूक ठप्प झाली. तसे घडू नये म्हणून या काळात घाटावर वेगमर्यादा घालून ती पाळली पाहिजे. रस्त्यावर रमलर बसवणेही आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईकडून धुळे, नाशिक, नगरकडे सीएनजी गॅस भरलेली अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. संभाव्य दुर्दैवी घटना गृहीत धरून आपत्कालीन सोयीसुविधा येथे उपलब्ध असणे आवश्यक आहे. तथापि, आवश्यक त्या लहानसहान सुविधाही उपलब्ध नाहीत म्हटल्यावर यंत्रणा आपत्कालीन सुविधांची काय बोंब पाडणार, असाच संतप्त सूर घाटालगतच्या गावांतून आहे.
2019 च्या जून-जुलैदरम्यान हा घाट खचून घाटातील रस्त्यावर 10 फूट लांब, तर 5 फूट खोल भेगा पडल्या होत्या. त्यामुळे 10 दिवस एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक करण्यात आली होती.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.