श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशच्या कमांडरचाही समावेश आहे. (Jammu Kashmir)
पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान काल (दि.२९) संध्याकाळी ही चकमक झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील नायरा भागात झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागात एका दहशतवाद्याचा ठार करण्यात आले.
पुलवामा येथे झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आलेले चार दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
याचबरोबर चरार-ए-शरीफ येथे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एका दहशतवाद्याला मारण्यात आले. चकमकीच्या ठिकाणाहून एक AK ५६ रायफलसह गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Jammu Kashmir)
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार म्हणाले की, पोलिसांचे हे मोठे यश आहे. गेल्या महिन्यात काश्मिर खोऱ्यात डझनभराहून अधिक चकमकीत २२ दहशतवादी मारले गेले होते.