मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक असल्यामुळे ते राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. अशोक गर्ग नावाच्या एका बड्या उद्योजकाशी त्यांची भागीदारी आहे, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या परिवाराने 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यानंतर 12 जानेवारी 2022 रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, अशोक गर्ग हे 2010 पासून दोन कंपन्या चालवतात. यापैकी एक कंपनी वाइन वितरणाचा व्यवसाय करते. मुंबई आणि पुणे परिसरातील हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये अशोक गर्ग यांच्या कंपनीकडून वाइन पुरवली जाते. या व्यवसायात अशोक गर्ग यांच्या कंपनीची एकाधिकारशाही आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण 100 कोटी इतकी आहे.
16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. संजय राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे सोमय्या म्हणाले.
हे ही वाचलं का ?