महाराष्ट्र एनसीसी देशात नं.1 | पुढारी

महाराष्ट्र एनसीसी देशात नं.1

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘पंतप्रधान ध्वजा’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. पृथ्वी पाटील एनसीसीच्या ‘एअर फोर्स विंग’ची सर्वोत्तम कॅडेट ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.

करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅलीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘पंतप्रधान ध्वजा’च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर, नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बेस्ट कॅडेटस्ला सन्मानित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह आदी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा कप कॅडेट कॅप्टन निकिता खोत आणि महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी. खंडुरी यांनी तर सीनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव यांनी ‘पंतप्रधान ध्वज’ सन्मान स्वीकारला.

देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 मधील विविध स्तरावरील मूल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘पंतप्रधान ध्वजा’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर दिल्ली एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान केला.

पृथ्वी पाटीलचा सन्मान

या कार्यक्रमात एनसीसीच्या वायुदलाच्या (सीनियर विंग) बेस्ट कॅडेटस्चा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी चुरस होती. लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेटची निवड करण्यात आली.

प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनसीसीच्या विविध विंगच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो. या मानाच्या गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राचे कॅडेटस् चमकले. महाराष्ट्राच्या सीनियर अंडर ऑफिसर गीतेश डिंगर याला एनसीसीच्या चारही विंगच्या परेड कमांडरचा बहुमान मिळाला. एनसीसीच्या छात्रा विंगच्या नेतृत्चाचा बहुमान सीनियर अंडर ऑफिसर सोनाली पाटील तर एअर फोर्स विंगचे नेतृत्व सीनियर अंडर ऑफिसर राघवेंद्र सिंह याने केले. या गार्ड ऑफ ऑनरसाठी एनसीसीच्या चारही विंगसाठी निवड झालेल्या देशातील 57 कॅडेटस्पैकी सर्वांत जास्त 7 कॅडेटस् हे महाराष्ट्राचे होते.

सात वर्षांनी राज्याला पंतप्रधान ध्वज

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 17 वेळा पंतप्रधान ध्वजाचा बहुमान मिळाला आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. राज्याला जवळपास तब्बल सात वर्षांनी हा पंतप्रधान ध्वजाचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्त्व आहे.

Back to top button