कोल्हापूर : दत्तवाड, सोळांकूर ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीय उपक्रमात अव्वल | पुढारी

कोल्हापूर : दत्तवाड, सोळांकूर ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीय उपक्रमात अव्वल

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षाघात नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दत्तवाड (ता. शिरोळ) व सोळांकूर (ता. राधानगरी) ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमात अव्वल ठरली आहेत. तसेच सेवा रुग्णालय कसबा बावडा व उपजिल्हा रुग्णालय, कोडोली आघाडीवर आहेत.

जिल्ह्यातील इतर 13 ग्रामीण रुग्णालयांचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राज्यातील 13 जिल्ह्यांत भारतातील उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात राष्ट्रीय पातळीवर कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षाघात हे रोग होऊ नये यासाठी हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात राबविला होता.

यात सेवा रुग्णालय कसबा बावडा, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, गांधीनगर, गडहिंग्लज तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये दत्तवाड, सोळांकूर, मलकापूर, शिरोळ, नवे पारगाव, कागल, पन्हाळा, चंदगड, राधानगरी, हातकणंगले, मुरगूड, खुपिरे, गगनबावडा, आजरा, नेसरी आदी रुग्णालयांनी सहभाग घेतला होता.

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाने कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षाघात या आजारांवरील रुग्णांवर गेल्या 1 वर्षभरापासून उपचार करून प्रत्येक रुग्णाची घरात तपासणी व औषध-गोळ्यांची ग्रामीण रुग्णालयाकडून पूर्तता करण्यात आली होती. त्यामुळे या राष्ट्रीय पातळीवरील योजनेत दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर खांबे, डॉ. शीलवर्धन चिपरीकर, डॉ. वर्षा चव्हाण, डॉ. सुजाता भोसले, डॉ. मानसी वसगडे, डॉ. गीतांजली किल्लेदार, डॉ. इरफान नदाफ, औषध निर्माण अधिकारी अनंत बोळाज यांनी हा उपक्रम यशस्वी करून राष्ट्रीय पातळीवर मजल मारली. सेवा रुग्णालय कसबा बावडा, उपजिल्हा रुग्णालय, वारणा-कोडोली व गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय दत्तवाड व सोळांकूर यांनी उत्कृष्टरीत्या कामकाज करून राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळविला आहे.

जिल्ह्यातील 13 ग्रामीण रुग्णालयांचे काम असमाधानकारक

उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, ग्रामीण रुग्णालय मलकापूर, शिरोळ, नवे पारगाव, कागल, पन्हाळा, चंदगड, राधानगरी, हातकणंगले, मुरगूड, खुपिरे, गगनबावडा, आजरा, नेसरी आदी 13 ग्रामीण रुग्णालयांचे काम असमाधानकारक ठरले आहे.

Back to top button