पुणे-बंगळूर समांतर ग्रीन हायवेला गती देणार | पुढारी

पुणे-बंगळूर समांतर ग्रीन हायवेला गती देणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सध्याच्या पुणे-बंगळूर महामार्गाला समांतर अशा ग्रीन एक्स्प्रेस हायवेचे लवकरच भूमिपूजन केले जाणार असून 45 हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पामुळे मुंबई व पुण्यातील वाहतूक कोंडीचा ताण कमी केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्यांचे अंतिम खोदाईद्वारे खुले करण्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी ते बोलत होते.

पुणे-बंगळूर मार्ग 8 लेनचा

गडकरी म्हणाले, सातारा-पुणे या महामार्गाला समांतर पुणे -बंगळूर असा नवीन ग्रीन एक्स्प्रेस बांधला जाणार आहे. हा रस्ता 640 किलोमीटरचा असणार आहे. हा मार्ग 8 लेनचा राहणार असून यासाठी 45 हजार कोटींचा खर्च येणार आहे. या महामार्गावर वेगाची मर्यादा ही 120 प्रतितास इतकी असणार आहे. सूरत, नाशिक, नगर, सोलापूरमार्गे हा महामार्ग दक्षिण भारतात जाणार आहे. समांतर महामार्ग बांधला जाणार असल्याने मुंबई व पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषणाला आळा बसणार आहे. लवकरच या मार्गाचेही भूमिपूजन होणार आहे, अशी माहितीही ना. गडकरी यांनी दिली.

महाराष्ट्राच्या विकासात भर पडणार

नव्या महामार्गालगत नवीन स्मार्ट सिटी, व्हिलेजेस, पार्क, औद्योगिक इंडस्ट्री तयार केल्यास पुण्याचा भार कमी होईल. यामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. सध्या येथील जमिनीच्या किमती कमी आहेत. त्यामुळे हे प्रकल्प राबवल्यास लोकांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

इंधन, वेळ व पैशाची बचत होणार

ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, पूर्वी एक बोगदा केल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्याच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर, कर्नाटक व केरळला जाण्यासाठी सोय झाली. या मार्गावरून शेतीमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे या भागाचा विकास होण्यास मदत झाली. परंतु, येथील एस वळणामुळे अनेक अपघात झाले. नवीन जुळा बोगदा व्हावा, अशी लोकांची मागणी होती. ना. नितीन गडकरी यांनी दोन बोगदे निर्माण करून 6 मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे इंधन, वेळ व पैशाची बचत होणार आहे. या कामामुळे. वेळ वाचल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढणार आहे. या बोगद्यामुळे जिल्हा व आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार आहे. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे व कर्नाटक, केरळ भाग जलदगतीने जोडला जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव यांनी प्रास्तविक केले.

दीड महिन्यात सातारा-कागल महामार्गाचे काम होणार सुरू

मध्यंतरी पुणे-सातारा रस्त्याची दुरवस्था झाली होती. कंत्राटदाराच्या आर्थिक बाबींमुळे हा प्रश्न उद्भवला होता. हे कंत्राट दुसर्‍याला दिले असते, तर कोर्ट कचेर्‍यांमध्ये 6 ते 8 महिन्यांचा कालावधी गेला असता. त्यामुळे ठेकेदाराकडून टोल काढून तो थेट सरकारकडे घेतला.

त्यामुळे या पैशातून या महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली आहे. खंबाटकी बोगद्याचा प्रकल्प पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर या रस्त्यावर कोणतीही अडचण राहणार नाही. त्याचबरोबर सातारा ते कागल हा 6 लेनचा रस्ता तयार करण्यासाठी टेंडर निघाले असून दीड महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे, असे ना. गडकरी यांनी सांगितले.

45 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांवर

खंबाटकी घाटात नवीन होणारे दोन बोगदे हे प्रत्येकी तीन-तीन लेनचे असणार आहेत. वेळे ते खंडाळा या दरम्यानच्या 12 कि.मी. अंतरात हे दोन बोगदे होणार आहेत. बोगद्याची एकूण अंतर्गत रुंदी साधारणपणे 16.16 मीटर आहे. बोगद्याची उंची ही साधारण 9.31 मीटर राहणार आहे.

बोगद्याची एकूण लांबी 1148 मीटर आहे. अडचणीच्या काळात दोन्ही बाजूच्या बोगद्यातून वाहतूक वळवण्यासाठी सिंगल लेन क्रॉस पॅसेज बोगदे 400 मीटर अंतरावर तयार करण्यात येणार आहे. या बोगद्यांमुळे खंबाटकी घाटातील 8 कि.मी.चे अंतर कमी होणार आहे. यामुळे सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील प्रवास हा 45 मिनिटांवरून अवघ्या 10 मिनिटांवर येणार आहे. यामुळे पैसा, इंधन व वेळेची बचत होणार आहे.

Back to top button