देशात कोरोना रुग्ण घटले, पण मृत्यूसंख्येत वाढ, २४ तासांत ८७१ जणांचा बळी - पुढारी

देशात कोरोना रुग्ण घटले, पण मृत्यूसंख्येत वाढ, २४ तासांत ८७१ जणांचा बळी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख हळूहळू मंदावत आहे. पण मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३५ हजार ५३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३ लाख ३५ हजार ९३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २० लाख ४ हजार ३३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३.३९ टक्के एवढा आहे.

याआधीच्या दिवशी दिवसभरात २ लाख ५१ हजार २०९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ६२७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान ३ लाख ४७ हजार ४४३ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.६० टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर १५.८८ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १७.४७ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १६४ कोटी ४४ लाख ७३ हजार २१६ डोस देण्यात आले आहेत. गुरूवारी ५७ लाखांहून अधिक कोरोना डोस देण्यात आले. कोरोना महारोगराईच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून आतापर्यंत १ कोटींहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात एका दिवसात १०३ बळी

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाने १०३ हून अधिक जणांचा बळी घेतला. तर केरळमध्ये ९० जणांचा मृत्यू झाला. दैंनदिन रुग्णसंख्येत घट होत असली तरी मत्यूंचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाने ९३५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वांधिक आहे.

‘नियोकोव’ या नव्या व्हेरियंटचं जगभरावर दहशतीचे सावट

ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या ‘नियोकोव’ या नव्या व्हेरियंटने जगभरावर दहशतीचे सावट पसरले आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरियंट आढळून आला असून, चीनमधील वुहान येथील वैज्ञानिकांनी या व्हेरियंटसंदर्भात मोठा दावा केला आहे. नियोकोव व्हेरियंटचा प्रादुर्भावही वेगात होईल आणि यामुळे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होतील. व्हेरियंटची लागण झालेल्या तीनपैकी एक जण दगावेल, असे भयावह भाकीत वुहानमधील वैज्ञानिकांनी याबाबत वर्तवले आहे.

Back to top button