Nashik Tomato Price : मनमाडला टोमॅटोला मिळाला चिंचोक्याचा भाव, शेतकरी हतबल
मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच असून, गेल्या महिन्यापासून टोमॅटोच्या भावात (Nashik Tomato Price) घसरण सुरू झालेली आहे. गुरुवारी (दि. 21) मनमाड बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 30 रुपये जाळी म्हणजेच प्रतिकिलो दीड रुपया इतका भाव मिळाला. सध्या मिळत असलेल्या भावात वाहतुकीवर केलेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने बाजार समितीच्या गेटसमोर टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला.
संबधित बातम्या :
कांदापाठोपाठ टोमॅटो नगदी पीक मानले जाते. त्यामुळे मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकरी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या भावात मोठी वाढ होऊन टोमॅटोला प्रतिकिलो 200 ते 250 रुपये इतका भाव मिळत होता. या भावामुळे काही शेतकरी थेट लखपती झाले. मात्र, आता पुन्हा टोमॅटोच्या भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. सध्या कांदा व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे कांदा आणि धान्य लिलाव बंद असले, तरी भाजीपाल्याचे लिलाव सुरू आहेत. गुरुवारी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली होती. लिलाव सुरू झाल्यावर टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला 30 रुपये अर्थात प्रतिकिलो दीड रुपया भाव मिळाला. कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (Nashik Tomato Price)
शेती करावी की नाही?
सध्या बी, बियाणे, रोप, खते, मजुरी, वाहतूक खर्च यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय समाधानकारक पाऊस झाला नसल्याने आम्ही पाण्याचे टँकर विकत घेऊन पीक जगवले. टोमॅटोतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मातीमोल भाव मिळत आहे. कांद्याने वांदा केला आहे. पावसाअभावी मका, मूग, सोयाबीन गेली आहे. आता टोमॅटोची हीच अवस्था झाल्याने शेती करावी की नाही, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. (Nashik Tomato Price)

