

नाशिक-लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
कांदा व्यापाऱ्यांच्या लिलावावरील बहिष्कारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (दि. २१) पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलविलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नाही. व्यापाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका कायम ठेवल्याने ही बैठक निष्फळ ठरली.
संबधित बातम्या :
कांद्यावरील निर्यातशुल्क वाढ, नाफेडच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याची थेट बाजारात विक्री केली जात असल्याने कांद्याला उठाव नसल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद केले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाल्याने कांद्याचे लिलाव ठप्प पडले आहेत. या प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. जिल्हाधिकारी जलज शर्मा व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बाजारशुल्क आकारणी, राज्यात आडतीवर असलेली बंदी, नाफेडमुळे कांद्याचे घसरलेले दर आदी व्यथा व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. येत्या २६ तारखेला पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबरील बैठकीत या समस्या मांडाव्यात. गणेशोत्सव व आगामी सणांचे महत्त्व लक्षात घेता तूर्तास संप मागे घ्यावा, अशी विनंती भुसे यांनी केली. मात्र, व्यापाऱ्यांनी ती फेटाळल्याने निर्णयाविनाच बैठक संपली. दरम्यान, जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची शुक्रवारी (दि.२२) दुपारी ३ ला येवल्यात पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा :