बीड : टोमॅटो एक रंग अनेक… २०० रुपयांचा टोमॅटो आता २ रुपयांवर; शेतकऱ्यांत नाराजी | पुढारी

बीड : टोमॅटो एक रंग अनेक... २०० रुपयांचा टोमॅटो आता २ रुपयांवर; शेतकऱ्यांत नाराजी

बीड; गजानन चौकटे : दोन-तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. कधी नाही ते शेतकऱ्यांच्या पदरी समाधानकारक दर मिळत होते. मात्र, यावर गृहिणींचे बजेट कोलमडले. टोमॅटो महागला अशी ओरड होत होती. स्वयंपाक घरात जेमतेम लागणाऱ्या टोमॅटोच्या दराला आवरण्यासाठी सरकारची यंत्रणा हालली. मात्र आता दोनशे रुपयांवरून टोमॅटोचे दर दोन रुपयांवर आल्याने उत्पादनाचाच काय मजुरीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या : 

पारंपरिक शेती बरोबरच शेतकरी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी फळे, भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात दाखल होताच शेतमालाचे बाजार भाव गडगडतात. अशातच कधी नव्हे ते टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत चार पैसे पदरी पडतील, अशी आशा व्यक्त होत होती. मात्र, काहींनी बजेटच्या नावाखाली टोमॅटो दरवाढीचा राष्ट्रीय प्रश्न केला. महिन्याकाठी दोन-तीन किलो लागणाऱ्या टोमॅटोने अर्थकारण धोक्यात आल्याने आफवा उठवली. दोनशे रुपयांवर गेलेले दर आता सद्य:स्थितीत खाली आल्याने कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री करावी लागत आहे.

शेतकऱ्याला दोन रूपये, ग्राहकांकडून दहा ते पंधरा रूपये

काबाड कष्ट करून शेतकरी शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणतो. मात्र, येथे आल्यावर त्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळतो. समाधानकारक भाव मिळाला नसला तरी नाईलाजाने तो विक्रीही करतो. दुसरीकडे मात्र किरकोळ बाजारात त्याची अधिक दराने विक्री केली जाते.

तालुक्यात टोमॅटो येतो कुठून?

तालुक्यातील अनेक शेतकरी हे भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही अधिक आहे. मात्र, असे असले तरी टोमॅटोची मागणी लक्षात घेता इतर जिल्ह्यातूनही टोमॅटो विक्रीसाठी येथील बाजारपेठांमध्ये दाखल होतो. यावर मात्र कोणी बोलण्यास तयार नाही, अशी खंत विविध ठिकाणच्या उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

२०० रुपयांवरुन दोन रुपयांवर दर

जुलै, ऑगस्ट महिन्यात टोमॅटो दरात मोठी वाढ झाली. दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो विक्री होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळत होता. मात्र, हे दर कमी झाल्याने दोन रुपयांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही निघेना

पारंपरिक शेतीबरोबरच फळे, पालेभाज्यांचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक स्रोत वाढविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तालुक्यात काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. यासाठी मशागत, लागवड खर्च, औषध फवारणी यासह तोडणी, बाजारपेठेत येण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च पाहता सध्या मिळत असलेला दर यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटो शेती करताना मशागत, तोडणी ते बाजापेठेत शेतमाल आणेपर्यंत खर्च लागतो. दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता पण आता भाव खूपच कमी झाले आहेत.

– सतिष येवले, शेतकरी, कोल्हेर

हेही वाचा : 

Back to top button