

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लाडक्या गणरायानंतर माहेरवाशिणी गाैराईंचे गुरुवारी (दि.२१) घरोघरी वाजतगाजत आगमन झाले. यावेळी महिला भाविकांनी "गौर आली गाैर, कशाच्या पावलांनी सोन्यारूपांच्या पावलांनी; आली तर येऊ द्या सोनपावली होऊ द्या" जयघोष करत माहेरवाशिणींचे स्वागत केले. शुक्रवारी (दि.२२) गौराईंचे महापूजन करून त्यांना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल.
संबधित बातम्या :
अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर घरोघरी ज्येष्ठा आणि कनिष्ठाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच गौराईंना विविध प्रकारचे अलंकार व साज चढविण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीनुसार खड्याच्या, पितळी मुखवटा, संक्रांतीमधील सुगडावरील मुखवटा, शाडूमाती तसेच निरनिराळ्या रूपांमध्ये लाडक्या गाैराईंचे आगमन झाले. माहेरवाशिणींच्या आगमनाने घरांमध्ये मांगल्य, चैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून लाडक्या माहेरवाशिणींच्या स्वागताची लगबग घरोघरी सुरू होती. अबालवृद्धांपासून ते घरातील बच्चेकंपनी स्वागताच्या तयारीत दंग झाले. महिलावर्गाकडून गौराईंसाठी करंज्या, लाडूसह विविध प्रकारचे गोडाधोडाचे नैवेद्य तयार करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी (दि. २२) ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर गौराईंचे महापूजन केले जाणार आहे. त्यानंतर महानैवेद्य अर्पण केला जाईल. त्यामध्ये १६ प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाचे आंबील, आळू व अंबाडीची भाजी यासह विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.
हेही वाचा :