दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील उमराळे बु. येथे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सुमारे सव्वादोन लाखांचा भेसळयुक्त मावा जप्त केला. हा मावा नाशिकमधील एका व्यापाऱ्याकडून नाशिकमधील विविध स्वीट मार्टला पुरविला जाणार होता. परंतु त्यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी हा डाव उधळून लावला.
संबधित बातम्या :
नाशिक जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवात लागणार्या मिठाईसाठी भेसळयुक्त मावा हा गुजरात राज्यातून एका पिकअप वाहनातून येत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक शांताराम नाठे, दीपक अहिरे, विनोद टिळे, गिरीश बागूल, अनुपम जाधव यांनी बुधवारी (दि. 20) मध्यरात्री पेठ-नाशिक महामार्गावर सापळा रचला होता. गुजरातकडून आलेले पिकअप वाहन (एमएच 15 एचएच 0021) पोलिसांनी उमराळे येथे अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात प्रत्येकी 30 किलोच्या ५० गोण्या असा सुमारे दीड टन भेसळयुक्त मावा आढळला. या माव्याची किंमत दोन लाख 27 हजार रुपये आहे. हा भेसळयुक्त मावा हा नाशिकमधील स्वीट मार्ट व्यावसायिक तुळशीराम राजाराम चौधरी (रा. विजय-ममता, नाशिकरोड) याने मागविला होता. नाशिक शहरातील विविध स्वीट मार्ट दुकानदारांना तो भेसळयुक्त माव्याचा पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात प्राप्त झाली. दिंडोरी पोलिसांनी हा साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी चौधरी याची चौकशी सुरू केली असून त्याने आतापर्यंत किती मावा आणला याची माहिती घेतली जात आहे.
पोलिस प्रशासन सतर्क
मिठाईमध्ये भेसळ होत असल्याचा प्रकार गंभीर आहे. याविषयी पोलिस प्रशासन सतर्क असून, या गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. याबाबत काही संशयास्पद माहिती असल्यास नागरिकांनी 6262256363 या हेल्पलाइनवर संपर्क साधत द्यावी, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केली आहे.
हेही वाचा :