मुलगी आयसीयूमध्ये होती अन् मोहम्मद शमी मैदानात देशासाठी लढत होता
टी 20 वर्ल्डकपमध्ये २४ ऑक्टाेबर राेजी भारत विरुध्द पाकिस्तान मध्ये सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. या सामन्यानंतर देशात नाराजीचे वातावरण तयार झाले. सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंना ट्रोल करण्यात आले. यात बॉलर मोहम्मद शमी यालाही ट्रोल करण्यात आलं.
दोन दिवसांपासून मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात येत आहे. एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे शमीला 'देशद्रोही' म्हणणारे ते दिवस विसरले असतील जेव्हा शमीने घेतलेल्या प्रत्येक विकेटवर टाळ्या वाजल्या जात होत्या. या लोकांना शमीची पूर्वीची कामगिरीची आठवण करुन दिली पाहिजे.
ऑक्टोबर २०१६ ची गोष्ट
न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. या मालिकेतील दुसरी कसोटी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होती. भारताने हा सामना १७८ धावांनी जिंकला. या मालिकेवरही कब्जा मिळवला होता. आयसीसीच्या रॅकींगमध्ये नंबर एकवर टीम आली होती. मायदेशात भारताची ही २५० वी कसोटी होती. शमीने दोन्ही डावात प्रत्येकी तीन बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्रोल्स करणाऱ्यांनी त्याची ही कामगिरी विसरली आहे. त्यावेळी शमीची मुलगी आयरा आयसीयूमध्ये दाखल होती. यावेळी अवघ्या १४ महिन्यांच्या आयराला खूप ताप आला होता, श्वास घेण्यास त्रास होत होता.
सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर शमीला त्याच्या मुलीच्या प्रकृतीची बातमी मिळाली. दररोज खेळ संपल्यानंतर शमी रुग्णालयात जात होता. रात्रभर आयरासोबत राहायचे आणि दुसऱ्या दिवशी खेळण्यासाठी मैदानावर परत यायचे. सामना संपल्यानंतर शमीला मुलीच्या डिस्चार्जची बातमी मिळाली होती.
शमी पाकिस्तानी फॅन्सवर भडकला होता
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तानकडून हरला होता. त्या दिवशी लंडनच्या ओव्हल मैदानावरून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना एक पाकिस्तानी चाहता भारतीय क्रिकेटपटूंची छेड काढत होता. तो पुन्हा पुन्हा विचारत होता, 'बाप कोण?' इतर कोणीही क्रिकेटर काहीही बोलला नाही, पण शमी परत आला आणि चाहत्याशी भिडला. नंतर एमएस धोनीने मध्यस्थी करून शमीला शांत केलं होतं.

