तेलंगणात जाणारा ५२ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

तेलंगणात जाणारा ५२ लाखांचा गुटखा जप्त

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करीचे नेटवर्क फोफावले आहे. शनिवारी रात्री दारव्हा मार्गावर एलसीबी पथकाने सापळा रचून गुटख्याचा ट्रक ताब्यात घेतला. सुरत (गुजरात) येथून आदिलाबाद (तेलंगणा) येथे जात असणाऱ्या ट्रकमध्ये तब्बल ५२ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा गुटखा हाती लागला. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला विश्वसनीय माहिती मिळाली की, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरून असलेल्या एका ट्रकमधून दारव्हा रोडने यवतमाळकडे येणार आहे. त्यावरून पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांना मिळालेल्या माहितीबाबत सूचना देऊन कायदेशीर कारवाई करण्याकरिता पाचारण केले. दारव्हा रोडवरील घाटात स्टोन क्रशर जवळ सापळा लावून थांबले. ट्रक क्रमांक एम.एच. ४० एके ७०४५ येताना दिसला. पोलिसांनी तो ट्रक थांबवून सोबत असलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचासमक्ष ट्रक चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने तोरन सुखराम गहाणे (२५) रा. वॉर्ड क्र. ३ मु. उचापूर, पोस्ट काकोडी ता. देवरी, जि. गोंदिया असे असल्याचे सांगितले. ट्रकच्या झडतीमध्ये सुगंधित तंबाखूची विविध कंपनीची पाकिटे आढळून आली. ज्याची किंमत ५२ लाख ३७ हजार ६०० रुपये इतकी आहे. हा सर्व प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांचे तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके व भादंवि कायद्याचे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला.

Back to top button