यवतमाळ : अवकाळीसह गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यासह १२ जनावरांचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ : अवकाळीसह गारपिटीचा तडाखा शेतकऱ्यासह १२ जनावरांचा मृत्यू

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात शेतात असलेल्या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. तर सहा तालुक्यांमध्ये वीज पडल्याने १२ जनावरे दगावली आहे. सोबतच ९६ गावांमध्ये वादळाने सर्वाधिक नुकसान केले आहे. जवळपास ८ हजार ३१९ हेक्टर ८९ आर क्षेत्रातील पिकांचेनुकसान झाले आहे. सोमवारी दिवसभर महसूल यंत्रणेने जिल्हाभरातील घटनांचे सर्वेक्षण करून एकूण नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.
वादळाचा सर्वाधिक तडाखा आर्णी, मारेगाव, उमरखेड, दारव्हा यां तालुक्यांना बसला आहे. दारव्हा तालुक्यातील लोही येथे बाळू लक्ष्मण पुंड (वय ३८) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. वीज पडल्याने दिग्रस येथे तीन जनावरे दगावली. मारेगाव तीन, वणी एक, झरी जामणी एक, दारव्हा दोन, राळेगाव दोन अशी एकूण १२ जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये ९ मोठ्या जनावरांचा तर तीन लहान जनावरांचा समावेश आहे. वादळानंतर सरासरी ९.७ मिमी पाऊस कोसळला. प्रचंड सोसाट्याचा वारा असल्याने १३२ घरावरील टीनपत्रे उडून गेली. यात सर्वाधिक नुकसान आर्णी तालुक्यात झाले असून १२१ घरांवरील छप्पर उडाले.

शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका

आर्णी तालुक्यातील सर्वाधिक तीन हजार २१० हेक्टरवरील गहू, चणा, तीळ, ज्वारी, संत्रा या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल उमरखेडमध्ये दोन हजार २७५ हेक्टर, दारव्हा तालुक्यातील एक हजार ८४६ हेक्टर क्षेत्रातील पिके जमीनदोस्त झाली. बाभूळगाव, केळापूर, दिग्रस, झरी, कळंब, पुसद, यवतमाळ या तालुक्यां- मध्येही पपई, गहू, ज्वारी, मका, हळद, मिरची, आंबा, तीळ, संत्रा या पिकांना फटका बसला आहे.

Back to top button