पट्टेदार वाघाची शिकार केल्याच्या आरोपावरून नागपूर वनविभागाने पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या जवळून वाघनखे आणि दात जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्षच वाघ शिकार प्रकरणात आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. नागपूर वनविभागाने केलेल्या कारवाईत वाघाचे दात आणि नखांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड बसस्थानकाजवळ वाघाच्या दातांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती नागपूर वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाद्वारे सापळा रचून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर आल्यानंतर मेळघाट सायबर सेलच्या मदतीने आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
खळकाळा येथील ताराचंद नेवारे, राजू कुळमेथे, वाढोणा येथील दिनेश कुंभले, अजय भानारकर, सोनपूर येथील प्रेमचंद वाघाडे हे सर्व आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला.
या सर्व आरोपींना बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. मौजा उमरेड येथून आणखी एका आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार यांनी सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाचा समावेश असल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई प्रादेशिक नागपूरचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार व उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे यांच्यासह वनपाल चौगुले, अगळे, भिसे तसेच वनरक्षक कोपले, नरवास, पेंदाम, श्रीरामे, हेडाऊ आणि दक्षिण उमरेड व उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी केली. तपास सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार करत आहेत.
हेही वाचलं का?