महाआवास अभियानच्या दुसर्‍या टप्प्यात ५ लाख घरे उभारण्याचा संकल्प | पुढारी

महाआवास अभियानच्या दुसर्‍या टप्प्यात ५ लाख घरे उभारण्याचा संकल्प

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाआवास अभियानच्या दुसर्‍या टप्प्यात पाच लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केला. महाराष्ट्राला अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धारही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

‘महाआवास अभियान टप्पा-दोन’चा राज्यस्तरीय शुभारंभ ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी उपस्थित होते.
डॉ. दिघे प्रास्ताविकात अभियानाविषयी सविस्तर सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महाआवास हेल्पलाईन 1800222019 हा टोल फ्री क्रमांकही खुला करण्यात आला.

ना. मुश्रीफ म्हणाले, महाआवासच्या पहिल्या टप्प्यात 1260 हून अधिक बहुमजली इमारती, 630 गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. 50 हजार 112 भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन दिली आहे. टप्पा-1 मध्ये 4 लाख 25 हजार घरकुले पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार आहे.

राज्यमंत्री सत्तार यांनी बेघर व्यक्तींना घरे देण्यात येणार्‍या अडचणी शासन स्तरावर तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक उपस्थित होते

Back to top button