Amravati Bandh : अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड | पुढारी

Amravati Bandh : अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड करण्‍यात आली होती. या घटनेच्‍या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने शनिवारी अमरावती बंदचे ( Amravati Bandh) आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगण्‍यिासाठी लाठीचार्ज केला.  शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्रिपुरामध्‍ये अल्‍पसंख्‍याकांवरील अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्‍यात आला होता. चित्रा चौक ते मालवीय चौकादरम्‍यान काही दुकानांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती. यामुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचाराच्‍या निषेधार्थ आज भाजपने अमरावती बंदची ( Amravati Bandh) हाक दिली होती. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

Amravati Bandh : शहरात तणाव

शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्ते राजकमल चौकात दाखल झाले. राजकमल चौकातील मुख्य बाजारपेठ बंद करीत मुस्लिम बहुल परिसर असलेल्या इतवारा भागात आंदोलन कर्त्यांनी मोर्चा वळविला. या परिसरात काही गाड्यांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुकाने बंद करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आंदाेलकांच्‍या हातात काठ्या असून जोरदार घोषणाबाजी करीत काही गाड्या व दुकानांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्‍यासाठी लाठीचार्ज केला. शहरातील परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेलच मात्र या घटनेचा काही घटक राजकारणासाठी करत आहेत. अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

हेही वाचलं का?

 

Back to top button