जायफळ : भरपूर पैसा मिळवून देणारे पीक, लागवड कशी करावी? | पुढारी

जायफळ : भरपूर पैसा मिळवून देणारे पीक, लागवड कशी करावी?

विलास कदम

जायफळ व जायपत्रीचा वापर मसाल्यात, मिठाईत केला जातो. जायफळाच्या तेलाचा वापर औषधे, साबण, टुथपेस्ट, चॉकलेट यासाठी केला जातो. या झाडास रोग व किडीपासून फारसा उपद्रव होत नाही. क्कचित फळ कुजणे हा रोग आढळून येतो. एकूणच जायफळाची आंतरपीक म्हणून केलेली लागवड बागायतदारांना भरपूर पैसा मिळवून देते.

जायफळ हे 20 मीटरपर्यंत वाढणारे सदापर्णी झाड आहे. जायफळामध्ये पपई व कोकमप्रमाणेच नर व मादी असे वेगवेगळे प्रकार असतात. जायफळाच्या बागेत 50 टक्के मादी, तर 45 टक्के नर व पाच टक्के संयुक्त फुले असणारी असतात. नर झाडास गुच्छाने फुले लागतात, तर मादी झाडाला एकएकटी फुले लागतात. जायफळाची फळे चिकूच्या आकाराची मात्र गुळगुळीत व पिवळसर असतात. टरफलाच्या आत गुलाबी रंगाची जाळी असते. हीच जायपत्री. फळांच्या टरफलाचे लोणचे, चटणी मुरब्ब्यासाठी, जायफळ व जायपत्रीचा वापर मसाल्यात, मिठाईत केला जातो. जायफळाच्या तेलाचा वापर औषधे, साबण, टुथपेस्ट, चॉकलेटसाठी केला जातो.

जायफळ उष्ण कटिबंधातील झाड असून पिकास दमट हवामान व 2500 ते 4000 मि.मी. पर्यंत पाऊस मानवतो. पिकाची व्यवस्थित विभागणी असेल, तर 1500 ते 3000 मि.मी. पर्यंत पाऊस चालतो. अतिथंड म्हणजे 10 सेंटिग्रेड किंवा त्याखाली तसेच अतिउष्ण म्हणजे 40 सेंटिग्रेडपेक्षा अधिक तापमान पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 750 मीटर उंचीपर्यंत पीक घेतले जाते. रेताड गाळमिश्रीत रेताड, वरकस अशा विविध प्रकारच्या परंतु उत्तम निचर्‍याच्या जमिनीत याची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन अधिक मानवते. या झाडाला सावलीचीही गरज असते म्हणून आंतरपीक म्हणूनही घेतले जाते. नारळ-सुपारीच्या बागेत या झाडाला लागणारी सावली व पश्चिमी वार्‍यांपासूनचे संरक्षण मिळते.

नारळाची लागवड प्रत्येकी साडेसात मीटर अंतरावर असल्यास पावसाळ्यापूर्वी प्रत्येक दोन नारळांमध्ये व सुपारीच्या बागेत चार सुपारींच्या चौफुलीवर 90 सेंमी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात 50 किलो शेणखत/ कंपोस्ट खत टाकावे. बियांपासून तयार केलेली रोपे हे नराचे किंवा मादीचे आहे ते फुले येऊ लागल्यावरच कळते. फळे फक्त मादी फळास लागतात. फुले सहा ते सात वर्षांनंतर येऊ लागतात. रोपे करण्यासाठी जायफळाचे ताजे बी वापरावे. बी रुजवण्यासाठी 15 सेंटिमीटर उंच, एक ते दीड मीटर रुंद व आवश्यक त्या लांबीचे वाफे तयार करावेत. वाफे तयार करण्यासाठी माती व वाळू यांचे योग्य मिश्रण वापरावे. तयार केलेल्या वाफ्यावर जायफळाचे बी रुजण्यास सुरुवात होते. 10 ते 15 दिवसांनी रोपे प्लास्टिकच्या पिशव्या लावण्यायोग्य होतात. सुमारे एक वर्षांची रोपे लागवडीयोग्य होतात. जायफळाची अभिवृद्धी कलमांद्वारेही करता येते. भेटकलम, मृदकाष्ठ कलम अशा कलमांच्या पद्धती वापरून जायफळाची अभिवृद्धी करता येते. महत्त्वाचा फायदा म्हणजे नर व मादीची हवी तेवढी झाडे लावता येतात. मादी झाडाची काडी वापरून बांधलेल्या कलमांपासून मादी झाड मिळते तसेच नराचेही आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कलमांना फुले लवकर लागतात. फुळे तिसर्‍याच वर्षी लागतात. त्यामुळे उत्पन्नही लवकर मिळते.

बागेत प्रत्येक दहा मादी झाडामागे किमान एक तरी नर झाडाचे प्रमाण असायला हवे. फलधारणेसाठी नर झाडांची आवश्यकता असते.
जायफळाच्या झाडास पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत/ कंपोस्ट 20 ग्रॅम नत्र (45 ग्रॅम युरिया), 10 ग्रॅम स्फुरद (65 ग्रॅम सुपर फॉस्फेट) आणि 50 ग्रॅम पालाश (85 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. ही खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी; मात्र 8 ते दहा वर्षांनंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत/ कंपोस्ट द्यावे. जायफळाची फुले आल्यावर फलधारणा ते ते काढणीपर्यंत 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु, जुलै-ऑगस्ट आणि फेब्रुवारी-मार्च या कालावधीत फळाची जास्त काढणी केली जाते. पूर्ण पक्व झालेल्या फळाचा रंग पिवळा होतो. तसेच टरफलास देठाच्या विरुद्ध बाजूस तडा जातो. अशी फळे काढावीत किंवा पडल्यानंतर गोळा करावीत.

टरफले वेगळे करून जायपत्री अलगद काढावी. परंतु, बरीचशी जायफळे पावसाळ्यात तयार होत असल्याने उन्हात वाळवता येत नाहीत. अशावेळी बिया व जायपत्र मंद उष्णतेवर वाळवाव्यात. जायपत्री 6 ते 8 दिवसांत, तर बिया 15 दिवसांत वाळतात. पूर्ण वाढीच्या मादी झाडापासून 500 ते 800 फळे मिळतात. पंचवीस वर्षांपर्यंत उत्पन्न वाढत जाते. पंचवीस वर्षांच्या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात. 60 ते 70 वर्षे या झाडापासून किफायतशीर उत्पन्न मिळत राहते. जायफळाला मसाल्याच्या पदार्थात चांगला भाव मिळतो. विशेषत: कोजागिरी पौर्णिमेचे मसाला दूध तर जायफळाशिवाय पूर्ण होत नाही. जायफळाच्या अधिक मात्रेने सेवनामुळे झोप अनावर होते. जायफळाचा सुगंध हा केशर, वेलदोडे यासारख्या सुगंधी मसाल्यांच्या मुकाबल्यात कुठेही कमी पडत नाही. अर्थात, जायफळ त्यांच्या बरोबरीने दाम मिळवत नसला, तरी अगदीच पडता दामही नाही.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : उसावर भारी पडतेय पेरूची बाग : कागलच्या शिवराज साळोखे यांची ३ एकरात फुलवली बाग

Back to top button