यंदा लगीनघाई जोरात, डिसेंबर, मे महिन्यांत 11 विवाह मुहूर्त | पुढारी

यंदा लगीनघाई जोरात, डिसेंबर, मे महिन्यांत 11 विवाह मुहूर्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा

दिवाळी संपताच लग्नाचा हंगाम येतो आणि शुभ विवाह मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. दरवर्षी मोठ्या थाटामाटात होणारे समारंभ गेल्या वर्षी कोरोनामुळे साधेपणाने आटोपण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने ‘यंदा कर्तव्य’ असणार्‍या वधू-वरांसाठी वर्षभरात 63 शुभ मुहूर्त आहेत. तुळशी विवाहानंतर 20 नोव्हेंबरपासून शुभ मुहूर्त सुरू होणार असून, ते 9 जुलैपर्यंत असणार आहेत. मार्चमध्ये गुरूच्या अस्तामुळे लग्नाचे केवळ चार मुहूर्त आहेत, तर डिसेंबर आणि मे महिन्यांत सर्वाधिक मुहूर्त असल्याने हे दोन महिने लग्नाच्या धामधुमीचे ठरतील.

20-25 जणांच्या, तर कधी नवरा-नवरी आणि भटजींच्या उपस्थितीत, तर अगदी ऑनलाईन, फेसबुक लाईव्हसारख्या पर्यायांचा अवलंब करीत अनेकांनी लग्ने आटोपली. त्यामुळे संबंधित परिवार, नातेवाईकांना लग्नात आनंद साजरा करता आला नाही. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने लग्नाळूंना काहीसा दिलासा मिळाला आहे. वधू-वरांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी 63 तारखा शुभ मुहूर्त आहेत. डिसेंबर आणि मेमध्ये सर्वांत जास्त मुहूर्त असल्यामुळे वधू-वर पक्ष सज्ज झाले असून, वधू-वर पिता तसेच नातेवाईकांकडून सोयरिक जुळविण्यावर भर दिला जात आहे.

विवाह मुहूर्त : गतवर्षीच्या तुलनेत 10 अधिक मुहूर्त

दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यावर लग्नसराईचे सनई, चौघडे वाजण्यास सुरुवात होईल. नोव्हेंबर 2021 मध्ये 20, 29, 30 यानंतर डिसेंबरमध्ये 1, 7, 8, 9, 13, 19, 24, 26, 27, 28, 29 अशा तारखा आहेत. तसेच 2022 मध्ये जानेवारीत 20, 22, 23, 27, 29, फेब—ुवारीत 5, 6, 7, 10, 17, 19, मार्चमध्ये 25, 26, 27, 28, एप्रिल 15, 17, 19, 21, 24, 25, मेमध्ये 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27, जूनमध्ये 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22 तर जुलै महिन्यात 3, 5, 6, 7, 8, 9 अशा तारखा असून, यंदा 63 शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 मुहूर्त अधिक आहेत.

विवाह मुहूर्त : हंगामी व्यावसायिकांना सुगीचे दिवस

कोरोनाचा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला. अशा परिस्थितीत हंगामी व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. मात्र, यावेळी लग्नसराईच्या हंगामापासून लग्नमंडप, हॉटेल ते बँड, ढोल, कॅटरर्स, मिठाई आदी व्यावसायिकांना मोठ्या अपेक्षा असून, आतापासूनच त्यांचे बुकिंग केले जात आहे.

Back to top button