भाजपकडून लढण्‍यासाठी नेहमी 'भाडोत्री' चा वापर : खासदार संजय राऊत | पुढारी

भाजपकडून लढण्‍यासाठी नेहमी 'भाडोत्री' चा वापर : खासदार संजय राऊत

औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

शिवसेना कामगारांचा पक्ष आहे.  बिल्‍डर आणि शेटजींचा पक्ष नाही. कामगारांच्या घामाचा तिरस्‍कार करणारे आज एसटीचा संप चिघळवण्याचे काम करत आहेत. भाजपकडे लढण्यासाठी स्‍वत:चं हत्‍यार नाही ते नेहमी ‘भाडोत्री’ चा वापर करतात. श्रमिकांची डोकी भडकवण्याचं काम भाजपकडून सुरू आहे, असा आराेप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. 13 )  केला. महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्‍वाखाली औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार

सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावर पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्नावर एसटीचा संप मिटावा असं राज ठाकरेंना वाटत असेल तर ते स्‍वागतार्ह आहे, असेही ते म्‍हणाले. महागाईविराेधातील मोर्चाला मनसेचा विरोध करत असल्‍याच्या पार्श्वभूमीवर महागाईशी सामना करण्यासाठी मनेसला कुणाकडून तरी अनुदान मिळत असेल, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

राज्‍याला केंद्राकडून मदत मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री महागाईवर का बोलत नाहीत, असा सवालही त्‍यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा देशभरात गैरवापर सुरू असल्‍याचा पुनुरूच्चार त्‍यांनी केला. भाजपने दुसऱ्यांचे खांदे वापरून हल्‍ले करू नयेत. मर्दासारखे समोर यावे, असे आव्हानही त्‍यांनी दिले. नवाब मलिक हे न्यायाची लढाई लढत आहेत. महाविकास आघाडी त्‍यांच्या पाठीशी आहे. अनिल देशमुख यांची तब्‍बेत बरी नसल्‍याचं कळतंय. ईडीचे अधिकारी देशमुखांना नीट वागणूक देत नाहीत, असा आराेपही त्‍यांनी केला.

हेही वाचलं का?

Back to top button