नागपूर : ‘त्या’ बेपत्ता दोघांचा गोळ्या घालून खून; एकाचा मृतदेह मिळाला दुसऱ्याचा शोध सुरू | पुढारी

नागपूर : ‘त्या’ बेपत्ता दोघांचा गोळ्या घालून खून; एकाचा मृतदेह मिळाला दुसऱ्याचा शोध सुरू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दीड कोटीचे दोन कोटी करून देण्याचे आमीष देऊन रक्कम परत न करता दोघांना गोळ्या घालून संपविल्याची घटना कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगणाबोडी शिवारातील एका फार्म हाऊसवर घडली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाची आहे. आरोपीने दोघांचे मृतदेह जाळून वर्धा नदीच्या पात्रात फेकले. यातील एक मृतदेह गुरुवार, २७ जुलै रोजी सापडला तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध पोलिस घेत आहे.

देवदत्त गोळे (४१, रा. नरकेश्वरी ले-आऊट, जयप्रकाशनगर, नागपूर) व निरालाकुमार जयप्रकाश सिंह (वय ४२, रा. एच. बी. टाऊन, नागपूर) असे मृतकांचे नाव आहे. हे दोघे मंगळवार, २५ जुलैपासून नागपूर येथून बेपत्ता होते. नागपूर येथील सीताबडी व सोनेगाव पोलिस ठाण्यात दोघांच्या बेपत्ता असल्याच्या तक्रारीवरून शोध सुरू केला असता दोघांच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी ओंकार महेद्र तलमले (वय २५, रा. स्मृती ले-आऊट, नागपूर), हर्ष आनंदलाल वर्मा (वय २२, रा. वाडी), दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ (वय २१, रा. गोधनी, नागपूर), लक्की संजय तुकेर्ले (वय २२, मरियमनगर, नागपूर), हर्ष सौदागर बागडे (वय १९, रा. दत्तवाडी, नागपूर) या पाच तरुणांना नागपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत या दोघांचा रक्कम परत करण्याच्या वादातून गोळ्या घालून खून कोंढाळी नजीकच्या रिंगणाबोडी शिवारातील फार्म हाऊस येथे करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळून कोंढाळी-अमरावती मार्गावरील कोंढाळीपासून ४० कि. मी. अंतरावरील वर्धा नदीच्या पात्रात फेकल्याची धक्कादायक माहीती दिली.

कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे ही माहिती काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांना दिली. या दोघांनी घटनास्थळी व त्यानंतर वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सिमेवरील वर्धा नदीच्या पात्रात मृतदेहांचा शोध सुरू केला. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस व स्थानिय नागरिकांच्या मदतीने मृत अमरिश गोळे यांचा मृतदेह कोंढाळी पोलिसांना मिळाला तर सायंकाळपर्यंत शोध घेऊनही मृत निरालाकुमार सिंह यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला नाही, हा मृतदेह वर्धा नदीच्या पुरात वाहून गेल्याची शक्यता आहे. कोंढाळी पोलिस ठाण्यात आरोपीविरूद भादंवि ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. ज्या फार्म हाऊसवर या दोघांचा खून झाला ते फार्म हाऊस संजय तुकेर्ले यांच्या मालकीचे आहे. याच फार्म हाऊसवर धाड टाकून कोंढाळी पोलिसांनी मोठा जुगार पकडला होता.

नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पाखले, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी कोंढाळी पोलीस ठाणे व घटनास्थळाला भेट दिली.

Back to top button