चंद्रपूर : सिंदेवाही स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देतानाच नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला | पुढारी

चंद्रपूर : सिंदेवाही स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देतानाच नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  एका व्यक्तीचे निधन झाले. दुपारी अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. सरण रचण्यात आला. विधिवत पूजा करून मृतदेहाला मुखाग्णी देणार तेवढ्यातच अचानक मधमाश्यांनी अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांवर हल्लाबोल केल्याने ३५ नागरिक जखमी झाले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही येथील स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मधमाशांच्या आक्रमक हल्ल्यामुळे तीन तासांनी मृतदेहाला मुखाग्णी देण्यात आली.

सिंदेवाही शहरातील महाकाली नगरी परिसरातील निवासी राजू मार्तंडवार यांचे आज शनिवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी स्मशानभूमीत पोहचली. स्मशानभूमीत मृतदेहाला मुखाग्णी देण्यासाठी सरण रचण्यात आले. मुखाग्णी देण्यापू्र्वी विधी पूर्ण करण्यात आल्या. पार्थिवाला मुखाग्णी देणार तेवढ्यात अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड तारांबळ उडाली. स्मशानभूमीतच नातेवाईक आणि अन्य नागरिकांना पळता भुई थोडी झाली. महिला आणि लहान मुलं यांचीही पळापळ झाली. या प्रकारामुळे काय करावे हे कोणालाही सूचेना त्यामुळे मधमाशांपासून वाचण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला. या घटनेत ३५ नागरिकांनी नातेवाईक जखमी झाले. तर चंदू श्रीकुंडवार, प्रदीप अटकापूरवार हे गंभीर जखमी झाले. मधमाश्यांचे काटे अंगाला, मांडीला, हाताला, मानेला चावा घेतल्याने रुतल्याने प्रचंड त्रास सुरू झाला होता.

मधमाश्यांच्या हल्ला केल्यामुळे प्रचंड तारांबळ उडाली. मृतदेह सरणावरच ठेवून सुरक्षित ठिकाणी लांब अंतरावर नागरिकांनी आश्रय घेतला. साडेतीन वाजेपर्यंत मधमाशांचा हल्लाबोल सुरूच होता. स्मशानभूमीच्या परिसरात मधमाशांचा वावर सुरूच होता. चार वाजता मधमाश्यां शांत झाल्यानंतर मृतदेहाला मुखागणी देऊन अंत्यसंस्कार पार पडले. जखमींवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूर तालुक्यातील सात बहिणी पेरजागड डोंगरावर पर्यटनासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता हे घटना ताजी असतानाच शिंदेवाही येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याने नागरिक प्रचंड घाबरलेले आहेत.

  1. हेही वाचलंत का?

Back to top button