कुपोषणरुपी दैत्याचा नाश करण्याचा प्रियंका गवळी यांनी घेतला ध्यास ! - पुढारी

कुपोषणरुपी दैत्याचा नाश करण्याचा प्रियंका गवळी यांनी घेतला ध्यास !

वाशिम ; पुढारी वृत्‍तसेवा 

सध्या देशभर नवरात्रौत्सव साजरा होत आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी देवी कधी काली मातेचे रूप धारण करते, तर कधी ती दीनदुबळ्यांवर मायेचे पंख पसरते. जशी परिस्थिती तशी रूपे देवीने धारण केली आहेत. आपल्या आजूबाजूला अशाच काही नवदुर्गा अन्यायाविरूद्ध  लढा देतात. दु:खी, कष्टी, वंचितांचा आधार बनतात. यापैकी एक म्हणजे वाशीमच्या महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी आहेत. त्‍यांनी जिल्ह्यातील ७ कुपोषित बालकांच्‍या पालनपाेषणाची जबाबदारी घेतली आहे. या बालकांना कुपोषणाच्या कक्षेतून बाहेर काढून कुपोषणरुपी दैत्याचा नाश करण्याचा ध्यास प्रियंका गवळी यांनी घेतला आहे.

उद्याच्या समर्थ भारताचे भविष्य असणारी आजची बालपिढी सुदृढ व सशक्त व्हावी, यासाठी शासनाचे प्रयत्‍न सुरू आहेत. याच संकल्पनेतून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वाशीम जिल्ह्यात पोषणमाहचे आयाेजन केले हाेते.

या निमित्त वैयक्तीकरित्या दत्तक घेण्यात आलेल्या ६ कुपोषित बालकांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्‍यांना कुपोषणाच्या श्रेणीमधून बाहेर काढण्यासाठी प्रियंका गवळी यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

 ७ कुपोषित बालकांना दत्तक घेतले

कुपोषणरुपी दैत्याचा नाश करण्यासाठीचे  हे युद्ध जिंकले आहे. पोषणमाहचे औचित्य साधत वाशीम येथील महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी यांनी काटा येथील ७ कुपोषित बालकांच्‍या पालनपाेषणाची जबाबदारी घेतली हाेती.

या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी विविध प्रकारचे जीवनसत्व युक्त अन्नधान्य पुरविण्यात आले. या बालकांची वेळोवेळी तपासणी करून शास्त्रोक्त पद्धतीने पोषक आहार देण्याकरीता त्यांच्या पालकांना प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व उपचारांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, दत्तक घेण्यात आलेल्या ७ बालकां पैकी ६ बालकांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ही बालके कुपोषणाच्या कक्षेतून बाहेर आली आहेत. राहिलेल्या एका बालकावर पूर्वीच्याच पद्धतीने उपचार सुरू आहेत.

कुपोषणाच्या निर्मुलनासाठी शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नास या उपक्रमामुळे मदत झाली आहे. शासकीय अधिकाऱी म्हणून आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतानाच सामाजिक जाणिवेतून कुपोषणाविरुद्ध चालविलेल्या या कार्याबद्दल प्रियांका गवळी यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :

Back to top button