Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदचा बेस्टवर परिणाम | पुढारी

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदचा बेस्टवर परिणाम

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Maharashtra Bandh महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईतील बेस्टवर झाला आहे. मुंबई शहरातील विविध ठिकाणच्या ९ बस गाड्या फोडल्या आहेत. तर, मध्य, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा सुरळीत सुरु आहे.

नऊ बस गाड्या फोडल्या

काल रविवारी (दि. १०) रोजी मध्यरात्रीपासून आज सोमवारी (दि.११) रोजी सकाळपर्यंत पहाटेच्या सुमारास बेस्टच्या ८ गाड्या आणि भाडेतत्वावरील एक अशा एकूण नऊ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा अनेक भागात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

यानंतर बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलिस यंत्रणेचे संरक्षण घेतले असून सर्व गाड्या बसगाड्या परिस्थितीचा आढावा घेवूनच सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, मध्य, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा सुरळीत सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई-पुण्यातील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. काळ्या फिती लावून दुकाने सुरूच राहतील, अशी भूमिका मुंबई व्यापारी संघामार्फत वीरेन शाह यांनी मांडली आहे.

मुंबई एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर महापालिका परिवहन उपक्रमांची एनएमएमटी बस सेवा काही वेळेपुरती सकाळ सत्रात सुरू केली होती. मात्र, बेस्टने बस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनएमएमटी व्यवस्थापकांनी ७५ मार्गावर धावणाऱ्या दोनशे बस ११ वाजता बंद केल्या.

अनेक शाळांमध्ये ८ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. शहरातील सर्व बाजार, दुकाने, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button