उजनी धरण : धरणाचे १६ दरवाजे उचलले | पुढारी

उजनी धरण : धरणाचे १६ दरवाजे उचलले

बेंबळे ; पुढारी वृत्तसेवा : उजनी धरण दि. 5 ऑक्टोबर रोजी 100 टक्के भरले आहे. सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा 108.31 टक्के झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारपासून धरणातून विसर्ग सुरू केला आहे. धरणाचे 16 दरवाजे उचलले असून रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून 25 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

2019 मध्ये उजनी 27 ऑगस्टला 100 टक्के भरले होते, तर 2020 मध्ये 6 ऑगस्टला 100 टक्के भरले होते. मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा दोन महिने उशिरा उजनी धरण 100 टक्के भरले आहे. धरण बांधल्यापासून म्हणजे गेल्या 41 वर्षांत उजनी 32 वेळा 100 टक्के भरले आहे. उजनीचे जलसंपदाशास्त्र उगम क्षेत्रातील पावसावर अवलंबून आहे. म्हणजे उजनी धरणावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे.

त्या धरणांतून आलेल्या पाण्यामुळे हे धरण भरले जाते; पण 2009 मध्ये केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर उशिरा का होईना धरण 100 टक्के भरले होते. त्यावेळी अन्य धरणांतून उजनी धरणात एक थेंबही पाणी आले नव्हते.
दरम्यान, यावर्षी मात्र दमदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील धरणांंच्या विसर्गातून धरण भरत गेले.

सध्याही उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनीत पाणीसाठा वाढला. दरम्यान, उजनी धरणात दौंड येथून विसर्गातही घट झाली होती. परंतु पुन्हा गेल्या आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसाने पुन्हा वाढ झली आहे. 5 सप्टेंबरला उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत उशिरा का होईना पाणीसाठा 100टक्के झाला.

पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभर व रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंडमधून येणार्‍या विसर्गात मोठी वाढ झाली. त्यामुळे खबरदारीसाठी शनिवारी सायंकाळपासून उजनी धरणातून 5 हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरू केला होता. आज त्यात वाढ करून सायंकाळी 25 हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला.

उजनीचा 25 हजार क्युसेक्स विसर्ग व निरामधून येणारा 5हजार विसर्ग मिळून निरा-भिमा संगमात विसर्ग तब्बल 30 हजार क्यूसेक्स होत आहे. त्यामुळे भिमा नदीची पाणीपातळी वाढत चालली आहे.त्यामुळे प्रशासनाकडून भीमाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाची पाणीपातळी

* एकूण पाणीपातळी : 497.260 मी.
* एकूण पाणीसाठा : 122.42 टीएमसी
* उपयुक्त पाणीसाठा : 58.76 टीएमसी
* टक्केवारी : 109.68 टक्के

उजनीत येणारा विसर्ग :

* दौंड : 14750 क्यूसेक्स
* बंडगार्डन : 14750 क्यूसेक्स
कालवा : 700 क्यूसेक्स
बोगदा : 200 क्यूसेक्स
वीज निर्मिती – बंद
नदी विसर्ग : 25,000 क्यूसेक्स
वीर धरणातून निरा नदीत विसर्ग : 4812क्युसेक्स

Back to top button