अंबाबाई व त्र्यंबोली भेटीचा सोहळा उत्साहात | पुढारी

अंबाबाई व त्र्यंबोली भेटीचा सोहळा उत्साहात

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ‘टेंबलाईच्या नावानं चांगभलं’, ‘मरगाईच्या नावानं चांगभलं’, ‘तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं’, ‘उदे गं अंबे उदे…’ आदी घोषणा, पारंपरिक वाद्यांचा गरज आणि पारंपरिक पालखी सोहळा अशा उत्साही वातावरणात रविवारी त्र्यंबोली देवीची यात्रा झाली. यानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा आणि कोहळा भेदण्याचा सोहळा झाला.

मुख्य सोहळा होईपर्यंत टेकडीवर भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. यामुळे प्रतिवर्षी होणार्‍या हुल्लडबाजीला चाप बसला. मात्र, पालख्या निघून गेल्यानंतर टेकडीवर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

यंदाच्या नवरात्रौत्सवात शनिवारी तृतीयायुक्त चतुर्थी आल्याने चौथ्या दिवशी (रविवारी) पंचमीला त्र्यंबोली यात्रा झाली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पारंपरिक मानकरी व मोजक्या लोकांनाच सोहळ्याच्या ठिकाणी सोडले. टेकडीवर आणि सभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्याने मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांना सोहळा होईपर्यंत टेकडीखालीच थांबावे लागले. सकाळपासूनच टेकडीवर लोकांना जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. भाविकांप्रमाणेच देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी, सेवेकरी इतकेच नव्हे, तर देवीचे पुजारी असणार्‍या गुरव समाज आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही टेकडीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच रोखण्यात आले. यामुळे अनेकांबरोबर वादाचे प्रसंग झाले.

हुजूर स्वार्‍यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा

परंपरेप्रमाणे हुजूर स्वार्‍यांच्या उपस्थितीत यात्रेचा मुख्य सोहळा झाला. छत्रपती घराण्यातील वंशज महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराजकुमार शहजीराजे छत्रपती व यशराजराजे छत्रपती यांच्या पारंपरिक वेशभूषेतील उपस्थितीत पालखी पूजनासह विविध धार्मिक विधी झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, महालक्ष्मी अन्नछत्रचे राजू मेवेकरी, शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्यासह छत्रपती देवस्थान ट्रस्ट व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सजवलेल्या वाहनांमधून पालख्या

कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही पालख्या सजवलेल्या वाहनांतून नेण्यात आल्या. अंबाबाई व तुळजाभवानीच्या पालख्या पारंपरिक मार्गावरून टेंबलाई टेकडीकडे नेण्यात आल्या. शाहूमिल व टाकाळा येथे पालख्यांचे स्वागत करण्यात आले. राजाराम रोडपासून टेंबलाई टेकडीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत कमानी, सप्तरंगी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्यांसह आरोग्यविषयक जनजागृतीपर देखावे साकारण्यात आले होते. परतीच्या मार्गावरही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

निधी गुरवला सलग दुसर्‍यांदा मान

श्री त्र्यंबोली देवी वहिवाटदार गुरव समाजाच्या वतीने त्र्यंबोली यात्रेचा मुख्य सोहळा झाला. त्र्यंबोली देवीची पूजा प्रदीप गुरव, संतोष गुरव, सुरेश गुरव, मधुकर गुरव यांनी बांधली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी-शिवछत्रपती यांच्या पालख्यांचे आगमन झाले. यानंतर अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा झाला.

’बालकुमारिका’ म्हणून मान गतवर्षीप्रमाणेच कृष्णा महादेव गुरव यांच्या कुटुंबातील निधी श्रीकांत गुरव हिला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे आज तिचा वाढदिवसही होता. कोहळ्याला त्रिशूल मारण्याच्या विधीनंतर कोहळ्याचा तुकडा मिळविण्यासाठी नेहमीप्रमाणेच काही काळ गोंधळ झाला. पोलिसांनी सुरुवातीपासूनच गर्दीवर नियंत्रण ठेवल्याने प्रतिवर्षी होणार्‍या हुल्लडबाजीला चाप बसला.

Back to top button