अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी | पुढारी

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील घरी आज सीबीआयने छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचले असून त्यांच्याकडे दोन जणांच्या नावे अटक वॉरंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, देशमुख कुटुंबीय कुठे आहे याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत.

RSS chief : विवाहासाठी हिंदू तरुण-तरुणी धर्म परिवर्तन कसे करतात? : सरसंघचालक

देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते आणखी अडचणीत आले आहेत. तसेच वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

सुमारे महिनाभरापासून ते अज्ञातस्थळी आहेत. न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नाही. आता सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या नागपूरातील निवासस्थानी अटक वॉरंट घेऊन पोहोचल्याची माहिती आहे. मात्र हा अटक वॉरंट कोणाच्या नावे आहेत हे नावे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button