हवामान बदलाचा विद्यापीठ घेणार अचूक वेध! | पुढारी

हवामान बदलाचा विद्यापीठ घेणार अचूक वेध!

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : पश्चिम घाट व कोल्हापूर परिक्षेत्रात पंचगंगा, कृष्णा नदीला आलेला महापूर, भूस्खलनाचा वाढता धोका, शहरी भागातील ढगफुटी, तापमानवाढ व बदलते ऋतुमान या गोष्टींतून हवामान बदलाचा अनुभव घेत आहोत. याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने हवामान बदल व शाश्वत विकास केंद्राची स्थापना केली आहे.

महाराष्ट्रात हवामान बदलाचा अभ्यास करणारे हे पहिलेच केंद्र ठरले आहे. हवामान बदलांच्या परिणामावर उपाय शोधणे व निर्माण होणार्‍या समस्यांचे आकलन व निर्मूलन करणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांसह विविध घटकांचे होणारे संभाव्य नुकसान टळणार आहे.

बदलते हवामान जगासमोरील प्रमुख पर्यावरणीय आव्हान बनले आहे. भारतात व इतरत्र भागात घडणार्‍या आपत्तींना हवामान बदल कारणीभूत असून त्याची तीव्रता वाढत आहे. द फिजिकल सायन्स बेसिस-2021 या ‘आयपीसीसी’च्या अहवालाने प्रथमच हवामान बदलावर प्रकाशझोत टाकला आहे.

हवामान बदलाचा कोल्हापूर, सातारा, सांगली व पश्चिम घाट परिक्षेत्रातील शेती व जलसंपदा, जंगल व जैव विविधता, आरोग्य यावर होणार्‍या परिणामांचे सखोल शास्त्रीय स्तरावर अध्ययन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात हवामान बदल व शाश्वत विकास केंद्राची (सेंटर फॉर क्लायमेट चेंज व सस्टेनेबिलिटी स्टडिज) स्थापना झाली आहे.

केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठातील अनेक विभाग शाश्वत विकास व समाजासाठी एकत्र येऊन काम करणार आहेत. हवामान बदल, जंगले व कृषी यांच्यातील संबंध स्थापित करणे, नदीला पूर येण्याची कारणे तपासणे, मानवी आरोग्यावर प्रतिकूल घटनांचे परिणाम जाणणे, वनीकरण व कृषी कार्यक्रमांबाबतीत हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मार्ग ओळखणे, शहरी विकासावर हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करून समाजातील वर्तणुकीत बदल घडवून आणणे आदी गोष्टी केल्या जाणार
आहेत.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांना एकत्र आणून क्षेत्रीय स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती केंद्र समन्वयक प्रा. सचिन पन्हाळकर यांनी दिली.

केंद्रासाठी सहा संशोधकांची नियुक्ती

केंद्राच्या माध्यमातून प्रथमतः हवामान बदल, पश्चिम महाराष्ट्र पंचगंगा फ्लड मॉडेलिंग व जिओइन्फॉर्मेटिक्सचा वापर करून पश्चिम घाटातील भूस्खलन विश्लेषण या तीन विषयांवर संशोधन केले जाणार आहे. संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठ स्वतः अनुदान उपलब्ध करून देणार आहे. भविष्यात विविध संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल. संशोधन योग्य दिशेने व वेळेत पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञाची नेमणूक केली आहे. केंद्रासाठी सहा संशोधकांची नेमणूक केली आहे.

Back to top button