रामभक्त कोण आणि लूट करणारे कोण? हे जनतेला माहिती आहे : नाना पटोले | पुढारी

रामभक्त कोण आणि लूट करणारे कोण? हे जनतेला माहिती आहे : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: रामाचे अस्तित्व नाकारणारे कोण? याविषयी भाजपने स्पष्टता करावी. भाजपमध्ये गेले ते सर्व रामभक्त आहेत आणि जे राहिलेत ते रामभक्त नाहीत का?. रामभक्त कोण? रामाच्या नावे लूट करणारे कोण? हे जनतेला माहिती आहे. सत्तेत आहेत ते रामभक्त आणि रामाचे अस्तित्व अमान्य करणारे विरोधात अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधींनी कधीकाळी राम मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठीच भूमिपूजन केले होते. याचा विसर पडू देऊ नये, जनतेकडून यासाठी कुठलेही पैसे घेतले नाहीत. उलट भाजपने त्यांच्या विविध संघटनांकडून गेली ३० वर्षे पैसे जमा केले. या पैशाचा हिशोब कधी दिला नाही. हे रामाच्या नावाने पैसे लुटणारे आज सत्तेत आले आहेत, ते फार काळ सत्तेत राहणार नाही, असा दावा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.

नुकत्याच झालेल्या जी- २० परिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट झाली. पेंटिंगच्या कामात मोठा घोळ करण्यात आला. शेकडो कोटीचे कंत्राट देण्यात आले. असे पैसे खाण्याचे वेगवेगळे पर्याय या लोकांनी शोधून काढले आहेत. जनतेच्या पैशावर या लोकांची मौजमस्ती सुरू आहे असा आरोप पटोले यांनी केला.

शिवसेनेला धडा शिकवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपची जवळीकता वाढत असल्याबाबत छेडले असता ते म्हणाले की, शेवटी जनताच ठरवत असते कोणाचे सरकार आणायचे किंवा नाही. राहुल गांधी सामान्य लोकांसाठी लढत आहेत. मात्र, सरकार केवळ आपल्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी लढत आहेत. काँग्रेस सातत्याने जनतेच्या प्रश्नावर बोलत राहणार असेही स्पष्ट केले.

भाजपची शेतकरी, गरीब विरोधी धोरणे आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी सुरू असताना पंतप्रधान, संरक्षण मंत्री बोलायला तयार नाहीत. आशिष देशमुख यांनी पक्षाकडे उत्तर दिले. १६ एप्रिलची सभा नागपुरात जंगी होणार आहे. आम्ही भाजपच्या विरोधाला घाबरत नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावले.

हेही वाचा : 

Back to top button