शेतकरी संकटात असताना सरकार देवदर्शनाला : अनिल देशमुख | पुढारी

शेतकरी संकटात असताना सरकार देवदर्शनाला : अनिल देशमुख

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, गारपीट झाली. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यांचे सहकारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. देवदर्शन घ्यायलाच पाहिजे पण अडचणीच्या वेळेस सर्व शासन घेऊन हा अयोध्या दौरा होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत केली. अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही पण आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला मदतीची गरज असताना हे योग्य नाही. केंद्र शासन काही निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. विदेशातून दुग्धजन्य पदार्थ आयात करणार असल्याने शरद पवारांनी विरोध दर्शविला आहे.

आज कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कापसाची निर्यात होत नाही आहे. सध्या 13 लाख गाठी कापूस निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे कापसाची आयात कमी आणि निर्यात जास्त असे धोरण शेतकऱ्यासाठी सरकारने आखावे अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली. आठ महिन्यांपूर्वी गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. पंचनामा राज्य शासनाकडे गेला तरीही संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. विधानसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे लवकर मोबदला द्यावा नाहीतर, आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देशमुख यांनी दिला. वज्रमुठ सभा यशस्वी होणार, १६ एप्रिलला महाविकास आघाडीकडून वज्रमुठ सभेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते या सभेला हजर राहणार आहेत. तीनही पक्षाला दोन-दोन सभांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण सहा वज्रमुठ सभा होणार आहेत. प्रत्येक पक्षाला दोन ठिकाणच्या सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर, कोल्हापूर, काँग्रेसकडे जबाबदारी असेल. संभाजीनगर, मुंबई ठाकरे गट आणि नाशिक, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. या सभेत प्रत्येक पक्षांकडून फक्त दोनच वक्ते भाषण करतील असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेल्या विरोधाविषयी बोलताना देशमुख म्हणाले, त्या ग्राउंडची क्षमता काय त्याची आम्हाला कल्पना आहे , संभाजीनगरच्या सभेचा धसका घेऊन भाजपा काही लोकांना पुढे करून हा विरोध केला जात आहे. आम्ही सभेची अधिकृत परवानगी घेतली आहे. त्यामुळे हा फक्त राजकीय विरोध आहे. यापूर्वी देखील त्याठिकाणी परवानगी घेऊन अनेक सभा झाल्या आहेत. अदानी प्रकरणी छेडले असता ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका योग्यच आहे. न्यायालयीन समिती नेमण्यात आली तरच योग्य चौकशी होईल.

Back to top button