शिक्षक रोज करायचे अत्याचार, ४ विद्यार्थिनी शाळेतच गेल्या नाहीत; कुटुंबीयांनी विचारताच पालक हादरले | पुढारी

शिक्षक रोज करायचे अत्याचार, ४ विद्यार्थिनी शाळेतच गेल्या नाहीत; कुटुंबीयांनी विचारताच पालक हादरले

अकोला; पुढारी वृत्तसेवा : गुरूला सर्वश्रेष्ठ मानणारी आपल्या देशातील संस्कृती. पण, या संस्कृतीला काही शिक्षकच काळिमा फासत असल्याचे अकोला जिल्ह्यात उघड झाले आहे. जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात एका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या चौथीच्या वर्गातील चार विद्यार्थिंनी लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या. याच शाळेतील २ शिक्षकांनी या चारही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात त्यांच्यावर बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अनेक दिवसांपासून हे दुष्कृत्य सुरू होते. मात्र, बुधवारी तर यातील एका शिक्षकाने क्रौर्याची सीमा ओलांडून एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला. याबाबत विद्यार्थिनीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्यामुळे पालकांनी शाळेत जाऊन इतर विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. या शिक्षकांनी इतरही काही विद्यार्थिनींसोबत असभ्य वर्तणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी चार विद्यार्थिनींनी ग्रामस्थांसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेची माहिती गावपरिसरात पोहोचताच ग्रामस्थांनीही पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ राजेश रामभाऊ तायडे व सुधाकर रामदास ढगे, रा. अकोला या शिक्षकांविरुद्ध बार्शिटाकळी कलम ३७६ व ३५४ भादंवि व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. दोन्ही शिक्षकांनी आज दि. ६ एप्रिलरोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणातील दोन्ही शिक्षकांवर जिल्हा परिषद अधिनियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

Back to top button