वाशिम; पुढारी वृत्तसेवा : रिसोड तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱी हतबल झाला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई व पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक व परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. यंदा आधीच उडीद, मूग या पिकांचा पेरा अल्प होता. त्यात संततधार पावसाने या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट आली. आता शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीन पिकावर आहेत.
तालुक्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनचीच आहे. याच पिकांवर शेतकऱ्यांचे पोट अवलंबून आहे. त्यात सततच्या पावसामुळे या पिकाला मोठा फटका बसला.
सोयाबीन पिकाच्या शेंगांना झाडावरच अंकुर फुटू लागले. त्यामुळे पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने नुकसानीची पाहणी करावी. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी करण्यात येत आहे.