विजय रुपनूर, पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे आहेत. या वैशिष्टपूर्ण स्थळात बनाळी गावचा 'शाकाहारी' असा आवर्जून उल्लेख केला जातो. बनशंकरीदेवी शाकाहारी (Vegetarian Village) असल्याने संपूर्ण गाव शाकाहारी आहे. इथं कोणताही गावकरी मांसाहार करत नाही. तर या इंटरेस्टिंग गावातील या आगळ्या वेगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल जाणून घेऊ…
संपूर्ण गाव शाकाहारी असण्यामागे गावातील देवी आहे. या गावात अशी अख्यायिका सांगितली जाते की, "मांसाहार केल्यास देवी कोपते. बनातील मधमाशा त्या व्यक्तीच्या अंगावर तुटून पडतात." बनाळीत प्रचलित पद्धतीचे कडक पालन केले जाते. भक्तांची जागृत देवस्थान म्हणून बनशंकरीवर मोठी श्रद्धा आहे.
जत शहरापासून उत्तरेस अवघ्या १० किलोमीटर अंतरावर बनाळी हे गाव वसले आहे. गावालगतच छोट्या डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य, नयनरम्य गर्द हिरवेगार बन आहे. या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे. दुष्काळी गावातील हे ठिकाण सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोट्या टेकडया, मधोमध लहानशी दरी, दरीमध्ये आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, नीलगिरी, सीताफळ आणि रामफळाचे उंचच उंच वृक्ष आहेत.
या बनात चिमण्यांचा चिवचिवाट पक्षांचा किलबिलाट नेहमीच ऐकावयास येतो. या परिसरात आल्यानंतर भाविकांची मुद्रा प्रसन्न होते. बनशंकरी या देवीला शाकंभरी या नावाने संस्कृतमध्ये उल्लेख केला आहे. या बनात दोन मोठ्या विहिरी असून एका विहिरीतून बनाळी गावास पाणीपुरवठा केला जाते. आणि दुसऱ्या विहिरीतून देवस्थान परिसरातील झाडे आणि इतर वापराकरिता पाण्याचा विनियोग केला जातो. मंदिराच्या चोहोबाजुंनी मोठी झाडे आहेत. २० ते २५ एकरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. तालुक्यात उन्हाळ्यात वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन आहे. येथे आकर्षक अशी श्री बनशंकरीची मूर्ती पाहावयास मिळते.
शुद्ध शाकाहारी गाव बनाळी
बनशंकरी देवी जागृत देवस्थान. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार (Vegetarian Village) करणारा कोणी शोधूनही सापडणार नाही. कारण कोणी मांसाहार केलेला बनशंकरीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर जंगलातील (बनातील) मधमाशा हल्ला करतात, अशी अख्यायिका आहे. याचा अनुभव काही लोकांना आल्यामुळे सहसा कोणी मांसाहार करुन याठिकाणी जाण्यास धजवत नाही. गावात जाणारा पाहुणा असेल तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना घडल्याचं ग्रामस्थांनी प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत.
त्यामुळे देवीच्या श्रद्धेपोटी गावात कोणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. मांसाहार पूरक कोणताही व्यवसाय केला जात नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसांत गावातील लोक कडकडीत उपवास करतात. दर शुक्रवारी या ठिकाणी महाप्रसादचे आयोजन केले जाते. या ठिकाणी अनेक विवाह सोहळे होतात. दसरा सणावेळी यात्रा भरते.
नवरात्र महोत्सव विविध उपक्रम
बनाळी येथील बनशंकरी देवस्थान येथून अनेक मंडळे ज्योत नेतात. सलग सात दिवस विविध कार्यक्रम असतात. दुर्गाष्टमी मुख्यदिवशी श्रीची पालखी मंदिराभोवती फेऱ्या घालून गावाभोवती फेरी घालतात. देवीच्या जीवन पटावर आधारित जत येथील कवी रशीद मुलाणी व लवकुमार मुळे यांनी बनशंकरी या नावाने लघुपट तयार केला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बनशंकरी देवस्थान मूळ स्थान कर्नाटक येथील बदामी येथे आहे. बनाळी येथे श्रीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तालुक्यातील वाळेखिंडी, शेगाव, बनाळी येथील भाविक कर्नाटक राज्यातील बदामी येथे बनशंकरी देवस्थानला जात होते. परंतु भक्तांना देवीने दृष्टांत दिला तिने भक्तांच्या इच्छेपोटी व श्रद्धापोटी तुमच्या गावी येणार असल्याचे भक्ताला सांगितले होते.
बदामी येथून जतला येत असताना भाविकाला मागे न राहण्याच्या अटीवर येण्याचे दृष्टांत दिला होता. त्यानुसार भक्त बनाळी जवळ न राहून मागे आले की नाही पाहण्यासाठी पहिले असता देवी तिथेच अदृश्य झाली. आज ही त्या ठिकाणी पादुका आहेत. या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वीचे पुरातन मंदीर आहे. या देवस्थानचा 'क' वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश असल्याने विकास होण्याच्या मार्गावर आहे.
पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरे (माहितीपट)