jayakwadi dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता - पुढारी

jayakwadi dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता

पैठण; पुढारी वृत्तसेवा : jayakwadi dam : पाणलोट क्षेत्रातून प्रतितास ७२ हजार ४०७ क्युसेस या क्षमतेने यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी आवक दाखल झाल्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मंगळवारी झपाट्याने वाढ झाली आहे.

कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. अजूनही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज (ता.२९) सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31% जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे.

प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. त्यामुळे द्वार परिचलन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील, अशी शक्यता आहे.

काल (ता.२८) रात्री दहा वाजता जायकवाडी jayakwadi dam धरणात ८८.२९ टक्के पाणी साठा नोंद झाला आहे. याच गतीने पाण्याची आवक सुरू राहिल्यास पुढील तीस तासांत जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९८. ५९ टक्के पर्यंत होण्याची शक्यता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर तालुका, जिल्हा प्रशासन व जायकवाडी पाटबंधारे विभागाने सतर्कता वाढवली आहे. संभाव्य पूर परिस्थिती पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी पैठण तहसील कार्यालयात तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला तालुक्यातील महत्वाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहण्याचा आदेश तहसील विभागाने दिला आहे.

आज दुपारी अकरा वाजण्याच्या आसपास नाथसागरातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पैठण शहरातील काठावरच्या गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नदीपात्रात कोणीही जाऊ नये. आपली वाहने , गुरेढोरे नदीपात्रात अथवा शेजारी ठेवू नयेत. अशी माहिती पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button