किस्सा कुर्सी का… ‘शापित’ खुर्ची | पुढारी

किस्सा कुर्सी का... ‘शापित’ खुर्ची

लंडन : जगभरात काही भन्नाट किस्से सांगितले जात असतात. त्यामध्ये किती तथ्य असते हा वेगळाच संशोधनाचा विषय असतो, मात्र अनेक लोक असे किस्से चवीने ऐकतही असतात. असाच एक किस्सा एका ‘शापित’ म्हटल्या जाणार्‍या खुर्चीबाबत आहे. ही खुर्ची इंग्लंडमधील थिर्स्क म्युझियममध्ये ठेवलेली आहे. या खुर्चीवर जो कुणी बसतो त्याचा मृत्यू होतो असा समज आहे!

या खुर्चीबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात असल्याने त्यावर कुणी बसू नये या हेतूने ही खुर्ची जमिनीपासून अनेक फूट उंच टांगून ठेवली जाते. ही खुर्ची थॉमस बस्बी नावाच्या एका माणसाची होती. ही खुर्ची त्याच्या अतिशय आवडीची होती आणि त्यावर आपल्याशिवाय अन्य कुणी बसू नये अशी त्याची इच्छा असे.

एकदा या खुर्चीवर त्याचे सासरेबुवाच बसले आणि जावयाचा राग अनावर झाला! त्याने रागाच्या भरात आपल्या सासरेबुवांचा खून केला.दोघांमध्ये व्यवसायासंबंधीचा वाद झाला होता असेही सांगितले जाते.

संबंधित बातम्या

सासर्‍याचा खून केल्याने बस्बीला सन 1702 मध्ये इंग्लंडच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये फाशी झाली. असे म्हटले जाते की मृत्यूपूर्वी त्याने ‘या खुर्चीवर कुणी बसले तर त्याचा मृत्यू होईल’ असा शाप दिला होता. अर्थातच त्याच्या मृत्यूनंतर त्याचे म्हणणे कुणी फारसे मनावर घेतले नाही व अनेकांना या खुर्चीवर बसून पाहण्याचा मोह झालाच.

विशेष म्हणजे अशा लोकांचा काही दिवसांमध्येच मृत्यू झाला! त्यानंतर ही खुर्ची शापित आहे असा समज वेगाने पसरला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातही या खुर्चीवर अनेक सैनिक बसले होते व त्यापैकी कुणीही युद्धात वाचला नाही असे सांगितले जाते. या खुर्चीला ‘डेथ चेअर’ असे म्हटले जाते. आता ती म्युझियममध्ये एका भिंतीवर टांगून ठेवण्यात आली आहे.

Back to top button