सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला संशयित भोंदूबाबा मनोहर भोसले याला मंगळवारी (दि. 28) करमाळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी 1 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
बलात्काराचा आरोप असलेल्या संशयित भोंदूबाबा मनोहर भोसले याला करमाळा पोलिसांनी 20 सप्टेंबरला करमाळा न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्याला न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी सात दिवसांची (सोमवारपर्यंत) पोलिस कोठडी दिली होती. पोलिसांकडून तपास सुरू असताना दोन दिवसांतच भोसलेची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
सोमवार, 27 रोजी कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी न्यालयात त्याची वैद्यकीय
कागदपत्रे दाखल करत उपचार सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व न्यायालयीन कोठडी मागितली होती. दरम्यान, मनोहर भोसले याची रूग्णालयातून सुटका होताच मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करून उर्वरित तपासासाठी सात दिवस पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
मात्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शिवरात्री यांनी भोसले यास 1 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, बलात्कार घटनेतील इतर संशयित अद्यापही फरार आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.