अमरावती : वर्धा नदी नाव दुर्घटनेतील ११ मृतदेह सापडले - पुढारी

अमरावती : वर्धा नदी नाव दुर्घटनेतील ११ मृतदेह सापडले

अमरावती; पुढारी ऑनलाईन : वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदी च्या पात्रात नाव उलटून (१४ सप्टेंबरला) अकरा जण बुडाले होते. त्यातील तीन मृतदेह घटनेच्या दिवशी सापडले. उर्वरित आठ मृतदेह आज गुरुवारी (दि. १६) सापडले.

त्यामुळे आता बुडालेल्या अकराही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यासाठी घटनेच्या दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दलाची पथके तसेच जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी अविरत मदतकार्य करीत होते.

मृतांमध्ये नारायण भोमाजी मटरे (वय ५९) , किरण विजय खंडाळे (२८) , वंशिका प्रदीप शिवणकर (२), मोनाली उर्फ मोहनी सुखदेव खंडाळे (११) अदिती सुखदेव खंडाळे (१३), निशा नारायण मटरे (२२), पियुष तुळशीदास मटरे (८) , अतुल गणेश वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (१९) , अश्विनी अमर खंडाळे (२५) , पूनम प्रदीप शिवणकर (२४) या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.

घटनेच्या दिवशी शाम मनोहर मटरे वय (२५) व राजकुमार रामदास उईके (४५) हे दोघे नदीतून पोहत बाहेर आल्याची माहिती मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली.

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन दिले आहे.

दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितच मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Back to top button