सांगली येथील तरुणाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू | पुढारी

सांगली येथील तरुणाचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून तिघांना पाण्याबाहेर काढण्यात तेथील जीव रक्षकांना यश आले आहे. मृत्यू झालेला तरुण सांगली जिल्ह्यातील आहे.

प्रणेश मुकुंद वसगडेकर ( २३,रा. सांगली ) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ओमकार उत्तम मेहत्तर ( 26,रा.कोल्हापूर ), वैभव जगताप ( 25, रा. सांगली ) आणि पृथ्वीराज पाटील (24, रा.सांगली) अशी वाचण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चारही मित्र खासगी गाडीतून बुधवारी सायंकाळी 6 वा.गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.

गुरुवारी दुपारी 11.45 वा.ते आंघोळ करण्यासाठी गणपती मंदिराजवळील समुद्रात गेले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने प्रणेश गटांगळ्या खाऊ लागला. त्याने आणि त्याच्या मित्रांनी आरडा – ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जीव रक्षक रोहित चव्हाण, ओमकार गवाणकर, अक्षय माने, अनिकेत चव्हाण, मयुरेश देवरुखकर यांनी पाण्यात उड्या घेऊन चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतू प्रणेशच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

याबाबत गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे मधुकर सरगर आणि सागर गिरीगोसावी यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलिस हवालदार राहुल जाधव करत आहेत.

Back to top button